आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आज वाढदिवस आहे. यंदा आपल्या जन्मदिनी ते तुरुगांत आहेत त्यामुळे त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात कार्ती यांनी आपल्या वडिलांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “आपण ७४ वर्षांचे झाले आहात मात्र, ५६!!! तुम्हाला रोखू शकत नाही.”

कार्ती पत्राद्वारे म्हणतात की, “आज आपण ७४ वर्षांचे झाले आहात. मात्र, कोणी ‘५६’ ( ५६ इंचाच्या छातीवाला) आपल्याला थांबवू शकत नाही. आपण आपला वाढदिवस कधीही भव्य स्वरुपात साजरा केला नाही. मात्र, आजकाल आपल्या देशात प्रत्येक छोट्या गोष्टीवर मोठे सोहळे साजले केले जात आहेत. आपल्याशिवाय हा वाढदिवस पहिल्यासाऱखा होणार नाही, आम्हा सर्वांना तुमची उणीव जाणवत आहे.” या पत्रात कार्ती यांनी आपल्या वडिलांच्या अटकेनंतर देश आणि जगभरात घडलेल्या महत्वाच्या गोष्टींचाही उल्लेख केला आहे.

चांद्रयान-२ बाबत माहिती देताना कार्ती यांनी पत्रात म्हटले की, “सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेल्या आपल्या विशेष रुची असल्याने चांद्रयान-२ मोहिमेचे लाईव्ह स्ट्रिमिंग बघणे आपल्याला आवडले असते. आम्हा नशिबवानांना अभिमानाने हे पहाण्याची संधी मिळाली. मात्र, यामध्ये इस्रोच्या लॅंडरशी तुटलेल्या संपर्कानंतर खूपच नौटंकी पहायला मिळली.

पुढे कार्ती यांनी पत्रातून देशाच्या घसरलेल्या जीडीपीबाबत मोदी सरकारवर तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या न्यूटन-आईन्स्टाइन वादावरही निशाणा साधला. तसेच आर्थिक संकटावरुन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या विधानाचाही पत्रात उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले की, “मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या १०० दिवसांचा सोहळा साजरा करीत आहे. अशा वेळी तुम्ही सरकारच्या विरोधात बोलत होतात त्यामुळे तुमचा आवाज दाबण्याची त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ होती. एका सत्ताधारी पक्षाविरोधात बोलण्याला मोठे साहस लागते.”

आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना १ सप्टेंबरला दिल्लीच्या विशेष कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टात प्रलंबित असून त्यावर २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.