हिंदूंच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. जे अल्पसंख्याकांविरोधात असहिष्णुताचा हवाला देत राम मंदिर उभारणीस विरोध केला आहे. त्यांनी पाकिस्तानला गेले पाहिजे. तिथे कशाप्रकारची लोकशाही आहे, हे पाहावे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर राम मंदिराचा मुद्दा तेव्हाच संपुष्टात आला असता असा दावा करत जवाहरलाल नेहरूंनी मतपेटीच्या राजकारणासाठी जाणूनबुजून हा मुद्दा पेटवत ठेवल्याचा आरोपही केला.

हिंदुत्वासाठी ओळखले जाणारे गिरीराज सिंह म्हणाले की, राम मंदिराची उभारणी भाजपासाठी राजकीय मुद्दा नाही. त्याऐवजी सर्व हिंदू देशात राहिले पाहिजेत हा पक्षाचा ‘अजेंडा’ आहे. जे देशात असहिष्णुता असल्याचे ओरडत आहेत. ते प्रत्यक्षात असहिष्णुता गटाचे आहेत. हेच लोक देशात घाण पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही सहिष्णु राहिलो तर अन्य समाज याचा फायदा घेऊ शकतात. भारतासारख्या हिंदू बहुल देशात हिंदुंनाच आपल्या देवतांची प्रार्थना करण्यापासून रोखले जाऊ शकते. अन्य समाजाला आम्हाला आमच्या देवांची प्रार्थना करण्यापासून रोखण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल करत हिंदूंच्या धैर्याची परीक्षा पाहू नका, असा इशाराही दिला.

भारत असा लोकशाहीचा देश आहे. जेथे कोणीही विरोध करू शकतो. जेएनयूत भारताविरोधात नारेबाजी केली जात होती. तेच लोक राम मंदिराला विरोध करत आहेत. काही लोक असहिष्णुतेबाबत बोलत आहेत. त्यांनी नशिबाचे आभार मानले पाहिजेत कारण ते भारतात राहतात. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकशाही काय असते, तेही पाहिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावाला.