योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत याच्याविरुद्ध हरिद्वारमधील न्यायालयाने गुरुवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. पतंजली योगपीठातील एका माजी कर्मचाऱयाचे अपहरण करून त्याची छळवणूक केल्याचा आरोप राम भरत यांच्यावर आहे. याच गुन्ह्यामध्ये त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले.
हरिद्वारमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. अर्चना सागर यांनी हे वॉरंट जारी केल्यानंतर पोलीसांनी राम भरत यांचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस अधीक्षक राजीव स्वरुप यांनी सांगितले. पोलीसांनी हरिद्वारसह वेगवेगळ्या ठिकाणी छापेही टाकले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पतंजली योगपीठातील नितीन त्यागी या माजी कर्मचाऱयाचे अपहरण करून त्याची छळवणूक केल्याच्या आरोपावरून पोलीस ठाण्यात राम भरत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राम भरत स्वतःहून पोलीसांपुढे हजर न झाल्यास त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणली जाईल, असेही स्वरूप यांनी स्पष्ट केले.