उत्तर कोरियाने रविवारी आणखी एका अमेरिकी नागरिकाला ताब्यात घेतले असून देशविरोधी कृत्य केल्याच्या आरोपाखाली त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर कोरियात अमेरिकी नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची ही चौथी घटना आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

प्यांगयाँग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात काम करणारे किम हॅक साँग यांना शनिवारी उत्तर कोरियामधील तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. किम हॅकने देशविरोधी कृत्य केल्याचा संशय असून त्याची चौकशी सुरु असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाने चौकशीसाठी ताब्यात घेतलेला हा चौथा अमेरिकी नागरिक आहे. यापूर्वी याच विद्यापीठात काम करणाऱ्या किम सँग डॉक याला एप्रिलमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

उत्तर कोरियातील अमेरिकी नागरिकाची सुरक्षा महत्त्वाची आहे. उत्तर कोरियात अमेरिकी नागरिकाला ताब्यात घेतल्यास आम्ही तेथील स्वीडनच्या दुतावासाच्या संपर्क असतो असे अमेरिकेमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा आणि गोपनीयतेच्या दृष्टीकोनातून यासंदर्भातील अधिक तपशील देण्यास अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

उत्तर कोरियाने अमेरिकी नागरिकांना ताब्यात घ्यायला सुरु केल्याने वॉशिंग्टन आणि प्यांगयाँगमधील तणावात भर पडली आहे. या दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणीवरुन संघर्ष चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी लष्कर स्थापना दिनानिमित्त उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र किंवा अण्वस्त्र चाचणी करण्याचा इशारा दिला होता. यानंतर अमेरिकेची क्षेपणास्त्रसज्ज अणुपाणबुडी दक्षिण कोरियात दाखल झाली होती. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील उत्तर कोरियासोबतच्या वादावर तोडगा काढण्याची गरज आहे असे मत मांडले होते.