उत्तर कोरियाने केलेल्या ताज्या आणि आतापर्यंतच्या सगळ्यात मोठय़ा अणुचाचणीबद्दल त्याला शिक्षा देण्याबाबत जागतिक महासत्तांचा विचार सुरू असतानाच, आपल्याला ‘वैध’ अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, ही आपली मागणी त्या देशाने पुन्हा एकदा रेटली आहे.

उत्तर कोरियाने केलेल्या गेल्या दशकभरातील सर्वात मोठय़ा अशा पाचव्या अणुचाचणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेधाचे स्वर उमटत असताना आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत र्निबधाचे प्रयत्न होत असतानाच, आपली आण्विक सज्जता ‘गुणवत्तेत आणि संख्येत’ वाढवण्याचा निर्धारही प्याँगयाँगने दोन दिवसातच व्यक्त केला.

उत्तर कोरियाच्या अणुचाचणीविरुद्ध ‘शक्य तितकी कठोर’ उपाययोजना करण्याबाबत वॉशिंग्टन व टोकियो विचार करत आहेत, असे जपानमध्ये पोहचलेल्या अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेकडून आपल्या स्वातंत्र्याला आण्विक धोका असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला क्षेपणास्त्र चाचणी व अणुचाचणी करणे आवश्यक आहे, असे उत्तर कोरियाने आग्रहाने सांगितले आहे. आपल्या देशाबाबत बराक ओबामा यांचे ‘पूर्णपणे दिवाळखोरीचे’ धोरण आहे, असे प्याँगयाँगमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले. अण्वस्त्रसज्ज देश म्हणून उत्तर कोरियाचे सामरिक महत्त्व अमान्य करण्याचा ओबामा  प्रयत्न करत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.