किम जोंग उन यांच्या बहिणीनं उत्तर कोरियामधून सोडण्यात येणाऱ्या फुग्यांवरून यापूर्वी दक्षिण कोरियाला सैन्य करार आणि इतर संबंध संपुष्टात आणण्याचा इशारा दिला होता. उत्तर कोरियामधील काही बंडखोर दक्षिण कोरियामधून काही फुगे सोडतात. तसंच त्यात किम जोंग उन यांच्या हुकुमशाहीविरोधात काही संदेशही लिहिलेले असतात, अशी माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकारानंतर संतापलेल्या किम जोंग यांनी दक्षिम कोरियाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाला अशी कृत्य करणाऱ्या लोकांना थांबवण्यात अपयश आल्याचं सांगत उत्तर कोरियानं सैन्य आणि राजकीय करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या अहवालात म्हटलं आहे की, मंगळवारी पहिले पाऊल म्हणून दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क कार्यालयातील संचार लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करणार आहे. तसंच उत्तर कोरियातील नागरिक दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांच्या विश्वासघातकी व्यवहारामुळे नाराज आहेत आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं, सांगण्यात आलं आहे.

प्रतीमा मलिन केली

अहवालात दक्षिण कोरियावर काही आरोपही करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या काही अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेतृत्वाची (किम जोंग उन) प्रतीमा मलिन केली आहे. तसंच आता समोरसमोरील बैठकीची गरज नाही, असे संकेतही देण्यात आले होते, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हा सरकारवरील हल्ला

दरम्यान, दक्षिण कोरियातून असे फुगे उडवणाऱ्यांना थांबवण्यासाठी उत्तर कोरियानं अनेकदा पोलिसांद्वारे कारवाई केली होती. पण यावर बंदीची उत्तर कोरियाची मागणी मात्र फेटाळण्यात आली होती. हा प्रकार म्हणजे आपल्या सरकारवरील हल्ला आहे, असं उत्तर कोरियाचं म्हणणं होतं.

सैन्य करार तोडणार

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाच्या अणुबॉम्ब तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षेविरोधात आणि मानवधिकाराचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत त्यावर टीका करण्यात आलेले फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग यांनी सैन्य करार तोडण्याची धमकी दिली होती. तसंच या बंडखोरांवर कारवाई न केल्यास दोन्ही देशांच्या उत्तम संबंधांचं प्रतीक मानली जाणारी कंपनी आणि संपर्क कार्यालयही बंद करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.