नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसाम, त्रिपुरासह इशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. नागरीक मोठया संख्येने रस्त्यावर उतरुन हिंसक विरोध प्रदर्शन करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करही तैनात करण्यात आले आहे.
– आसाममध्ये पुढच्या ४८ तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
– गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवण्यात आले आहे. मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्याजागी पदभार स्वीकारला आहे.
– धाकुआखाना, लखीमपूर जिल्ह्यात आंदोलकांनी भाजपा आणि आसाम गण परिषदेचे कार्यालय पेटवून दिले.
– हिंसक आंदोलनाचा इशान्येकडच्या राज्यामधील हवाई आणि रेल्वे सेवेला फटका बसला आहे.
– आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य इशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत.
– त्रिपुरा आणि आसाममधील लोकल ट्रेन सेवा बंद केली आहे.
– गुवाहाटीमध्ये अनेक नागरीकांनी संचारबंदी झुगारुन रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
– नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन संपूर्ण आसाममध्ये तणावाची स्थिती असून लष्कराने गुवाहाटीमध्ये फ्लॅग मार्च केला.
– गुवाहाटी शहर आंदोलनाचे मुख्य केंद्र असून आसामच्या चार भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.
– आसाम रायफलच्या जवानांना बुधवारी त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 3:12 pm