ईशान्येकडील राज्यात भाजपने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासात्मक धोरणे व अमित शहा यांचे संघटन कौशल्य याला आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. लवकरच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर हा पाचवा पराभव आहे अशी टीका त्यांनी केली. लवकरच त्यांची पराभव मालिका आणखी वेग घेईल असे ते खोचकपणे म्हणाले. त्रिपुरा, नागालँड व मेघालय विधानसभा निवडणुकांत भाजपने चांगली कामगिरी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरात निवडणुकीनंतर राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाले त्याचवेळी भाजपचे काम आता सोपे झाले आहे असे आपण म्हणालो होतो याची आठवण त्यांनी करून दिली. ईशान्येत भाजपची सरशी झाल्याने आता त्या भागाचा विकास  होईल. काँग्रेसने राहुल अध्यक्ष झाल्यानंतर पाच राज्ये गमावली, तर उपाध्यक्ष असताना दहा राज्ये गमावल्याचे आदित्यनाथ म्हणाले.