राज्यसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन माझ्यामध्ये आणि समाजवादी पार्टीमध्ये भांडण लावून देण्याचा भाजपाचा उद्देश होता. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शनिवारी सांगितले. मायावती गरम डोक्याची आहे, ती लगेच समाजवादी पार्टीबरोबर आघाडी मोडण्याचा निर्णय घेईल असे भाजपाला वाटत आहे. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजापाला यशस्वी होऊ देणार नाही.

मी भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मायावती म्हणाल्या. शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने मोर्चेबांधणी केल्यामुळे मायावतीच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपाच्या अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाज पार्टीच्या भीम राव आंबेडकर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उत्तर प्रदेशातून एकूण १० उमेदवार राज्यसभेवर जाणार होता. त्यात भाजपाच्या आठ आणि समाजवादी पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय सुनिश्चित होता.

पण भाजपाने बसप आणि सपाच्या मतांमध्ये फाटाफूट घडवून अनिल अग्रवाल यांच्या रुपाने आपला नववा उमेदवारही निवडून आणला. प्रतिस्पर्धी पक्षांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप मायावतींनी केला. भाजपाच्या बाजूने मतदान करणारे आमदार अनिल कुमार सिंह यांना मायावतींनी आज पक्षातून निलंबित केले.

राज्यसभा निवडणुकीत मायावतींकडे समाजवादी पार्टीची अतिरिक्त मते होती. भाजपाचा पराभव करण्यासाठी आपण काँग्रेसला पाठिंबा देऊ असे मायावतींनी सांगितले. जातीयवादी शक्तिंना बाहेर ठेवण्यासाठी आम्ही केंद्रात नेहमीच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसबरोबर आमचे चांगले संबंध असून काँग्रेसच्या सातही आमदारांनी आम्हालाच मतदान केले असे मायावती म्हणाल्या.