कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड याला श्वेतवर्णीय अमेरिकी पोलीस अधिकाऱ्याने  गळ्यावर गुडघा दाबून श्वास घुसमटवून ठार मारल्याच्या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या डार्नेला  फ्रेझर या सतरा वर्षीय मुलीचा पुलित्झरतर्फे खास गौरव करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरोधात ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ ही चळवळ सुरू झाली होती.  नागरी पत्रकारितेचे उत्तम उदाहरण तिने घालून दिले होते. सत्य व न्यायाच्या शोधासाठी तिने काम केले, असे पुलित्झर पुरस्कार समितीने म्हटले आहे.

फ्रेझर ही सध्या वर्तमानपत्रांना मुलाखत देत नाही असे तिच्या माध्यम सल्लागारांनी म्हटले आहे. २५ मार्च २०२० रोजी ही घटना घडली होती.  पुलित्झर मंडळाने मिनियापोलिसच्या स्टार ट्रिब्यूनला ब्रेकिंग न्यूजच्या वार्तांकनाचा पुरस्कार जाहीर केला.

चित्रफितीमुळे आंदोलन

जॉर्ज फ्लॉइडबाबतचा प्रकार जिथे घडला त्या किराणासामानाच्या दुकानाच्या कोपऱ्यावरच त्या वेळी फ्रेझर ही नऊ वर्षांच्या चुलत भावंडासमवेत उभी होती. पोलीस अधिकारी शॉविन याने फ्लॉइडच्या गळ्यावर गुडघा दाबल्याचे तिने पाहिले. नंतर तिने भावंडाला दुकानाच्या आत जायला सांगितले व बाहेर उभे राहून तिने या घटनेचे पदपथावरून चित्रण केले.  तिचा ही चित्रफीत फेसबुकवर प्रसारित झाली होती. त्यानंतर मिनियापोलिस येथे हिंसक आंदोलन करण्यात आले होते. शॉविन विरोधातील साक्षी पुराव्यात तिची चित्रफीत प्रमाण मानली गेली. एप्रिलमध्ये शॉविन याला दोषी ठरवून जूनमध्ये शिक्षा सुनावण्यात आली.