देशभरात एकीकडे करोनाबाधितांच्या संख्या वाढत असली तरी, दिलासादायक बाब म्हणजे दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रणाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण २ लाख २७ हजार ७५५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, मागील २४ तासांत १३ हजार ९२५ जण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण करोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ते ५५.४९ टक्क्यांवर पोहचले आहे. केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

याचबरोबर दररोजच्या नमूने तपासणीच्या संख्येतही वाढ होत आहे. मागील चोवीस तासांत १ लाख ९० हजार ७३० नमूण्यांची तपासणी केली गेली. आतापर्यंत एकूण ६८ लाख ७ हजार २२६ नमूने तपासले गेले आहेत.

भारतातील करोना बाधित रुग्णांच्या दृष्टीनं महत्त्वाची घटना औषधनिर्माण क्षेत्रात आज घडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना फायदेशीर ठरत असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचं उत्पादन करण्यासाठी केंद्रीय औषध महानियंत्रक विभागानं हेटेरो व सिप्ला या दोन भारतीय औषध निर्माण कंपन्यांना परवानगी दिली. रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवे होते. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ही आयात थांबवण्यात आली आहे. आता भारतातच त्याचे उत्पादन होणार असल्याने करोना रुग्णांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सद्यस्थितीस ४ लाख १० हजार ४६१ करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ६९ हजार ४५१ जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले २ लाख २७ हजार ७५६ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३ हजार २५४ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.