11 December 2017

News Flash

ओबामा आशिया भेटीवर

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बराक ओबामा या महिनाअखेरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण

पी.टी.आय. वॉशिंग्टन | Updated: November 10, 2012 5:16 AM

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बराक ओबामा या महिनाअखेरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण आशियामधील बर्मा, कंबोडिया, थायलंड या राष्ट्रांपासून सुरू करणार आहेत. त्यांच्यासमवेत या दौऱ्यामध्ये संरक्षण सचिव लिओन पॅनेटा आणि परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटनदेखील सहभागी होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. दक्षिण आशियासंबंधी ओबामा प्रशासनाच्या बदलत्या दृष्टिकोनाचा दाखलाच या प्रस्तावित भेटीमुळे समोर आला आहे.
१७ ते २० नोव्हेंबर रोजी कंबोडिया येथे होणाऱ्या पूर्व आशियाई राष्ट्रांच्या शिखर परिषदेमध्ये ओबामा सहभागी होणार आहेत. त्यानंतर बर्मा आणि थायलंड या राष्ट्रांना ते भेट देणार असल्याचे व्हाइट हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आले. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलक यांची भेट घेऊन ओबामा उभय राष्ट्रांमधील १८० वर्षांच्या जुन्या राजनैतिक मैत्रीला वृद्धिंगत करणार असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी स्पष्ट केले.  म्यानमारचे (बर्मा) अध्यक्ष आणि लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांची भेट या दौऱ्याचे मुख्य आकर्षण असून, तेथे ते आपले विचार मांडणार आहेत. आर्थिक प्रगती, व्यापारवृद्धीतून तयार होणारी रोजगारनिर्मिती, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य, मानवी हक्क, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर या भेटीमध्ये आशियाई राष्ट्रांशी चर्चा होणे अपेक्षित असल्याचेही कार्नी यांनी नमूद केले.

मनमोहन सिंग यांचे निमंत्रण
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील परस्परसंबंधांना अधिक चालना देण्यासाठी उत्सुक असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पुन्हा भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे. ओबामा अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधानांनी गुरुवारी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. त्या वेळी ओबामा यांना भारतभेटीचे निमंत्रण देण्यात आले. गेल्या चार वर्षांत पंतप्रधान आणि ओबामा यांची विविध ठिकाणी अनेकदा भेट झाली आहे. दूरध्वनीवरून गुरुवारी झालेल्या चर्चेच्या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.     

सुसान राईस होणार हिलरींच्या उत्तराधिकारी?
वॉशिंग्टन:    संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत सुसान राईस ह्यांचे नाव अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. विद्यमान परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपले पद सोडण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे. राईस यांची परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाल्यास त्या कोंडालिसा राईस यांच्यानंतर अमेरिकेच्या पराराष्ट्रमंत्री होणाऱ्या दुसऱ्याच आफ्रिकी-अमेरिकी महिला ठरतील. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये ओबामा प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणांची आक्रमक मांडणी करणाऱ्या अधिकारी ही राईस यांची मुख्य ओळख. लिबियातील तत्कालीन हुकूमशाह गडाफी यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांना अमेरिकेने मदत करण्यास त्यांनी पाठिंबा दिला होता. लिबियामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्यासंदर्भातील सुरक्षा परिषदेचा ठराव समंत करण्यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओबामांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा यापूर्वीच दिला आहे. राईस यांच्या प्रमाणेच सिनेटच्या परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख जॉन केरी आणि सुरक्षा सल्लागार टॉम डोनिलिओन हे देखील परराष्ट्रमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.    

भारतासोबत संबंध दृढ करण्यास इच्छुक
वॉशिंग्टन: आशिया खंडात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्र म्हणून अमेरिका भारतासोबतचे संबंध वृद्घिंगत करण्यास इच्छुक असल्याचे अमेरिकेचे संरक्षण सचिव लिओन पॅनेटा यांनी आशिया भेटीच्या पाश्र्वभूमीवर स्पष्ट केले. भारत हे संपूर्ण आशिया खंडात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्र आहे. पॅनेटा यांनी यापूर्वीच भारताला भेट देऊन संरक्षणविषयक धोरणांवर फलदायी चर्चा केली आहे. यापुढे भारतासोबतचे संबंध आणखी वृद्घिंगत करण्यावर अमेरिकेचा भर असेल, असे पॅण्टेगॉनचे प्रवक्ते जॉर्ज लिटिल  यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार वाढण्याबाबत अमेरिका प्रयत्नशील असेलच, पण त्याचबरोबर सुरक्षेसंदर्भातील मैत्रीही आणखी वाढलेली असेल, असा विश्वास लिटिल यांनी व्यक्त केला.      

First Published on November 10, 2012 5:16 am

Web Title: obama visit asia