इन्स्टाग्रामवरील हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह फोटो काढून टाकण्यात आल्याची माहिती फेसबुकची मालकी असणाऱ्या इन्स्टाग्रामने दिल्ली उच्च न्यायालयाला दिली आहे. इन्स्टाग्राम युझर्सने पोस्ट केलेले हे आक्षेपार्ह फोटो आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म वरुन काढून टाकल्याचं कंपनीने न्यायालयासमोर स्पष्ट केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

न्यायमूर्ती रेखा पिली यांनी यासंदर्भात नोटीस जारी करुन फेसबुक आणि इन्स्टाग्राम करुन स्पष्टीकरण मागवलं होतं. नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन कंपनीकडून केलं जात आहे की नाही यासंदर्भातही न्यायालयाने कंपनीकडे विचारणा केली होती. वरिष्ठ वकील मुकुल रस्तोगी यांनी न्यायालयामध्ये इन्स्टाग्रामचा मालकी हक्क असणाऱ्या फेसबुक कंपनीची बाजू मांडली. इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्यात आल्याचं मुकुल यांनी न्यायालयाला सांगितलं. तसेच अर्जदारांनी नोंदवलेल्या आक्षेपानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडून या खटल्यासंदर्भातील कारवाईची कोणतीही माहिती त्रयस्त व्यक्तीला पुरवली जाणार नाही, असंही फेसबुककडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> राष्ट्रध्यक्षांचं Tweet Delete केल्याने ‘या’ देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला ‘अच्छे दिन’?

फेसबुकने केली अधिकाऱ्याची नेमणूक…

नवीन माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार कंपनीने तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. याच व्यक्तीकडे इन्स्टाग्रामसंदर्भातील तक्रारींची जबाबदारीही देण्यात आल्याचं मुकुल यांनी फेसबुकच्यावतीने स्पष्ट केलं. केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू केले आहेत. फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

केंद्राकडूनही मागवली माहिती

नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार केंद्र सरकार आणि सोशल नेटवर्किंगर कंपन्यांकडून आवश्यक असणारी पावले उचलली गेली आहेत की नाही यासंदर्भातील माहिती न्यायालयाने नोटीस पाठवून केंद्र सरकारकडून मागवली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> Swiggy ने विचारलं, ‘जेवलीस का?’; उद्धव ठाकरेंच्या फोटोपासून आई काय म्हणालीपर्यंत मराठी पोरा-पोरींनी दिले भन्नाट रिप्लाय

नक्की काय आहे हे प्रकरण?

अर्जदार अदित्य सिंग देसवाल यांनी इन्स्टाग्रामवरील हिंदू देवी-देवतांच्या आक्षेपार्ह फोटोंबद्दल फेसबुकविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली होती. इन्स्टाग्रामवरील ‘इस्लाम की शेरणी’ नावाच्या अकाऊंटवरुन हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. या फोटोंमध्ये अश्लील भाषा वापरुन हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह, वादग्रस्त फोटो आणि कार्टून पोस्ट करण्यात आल्याचं देसवाल यांनी अर्जात म्हटलं होतं.

नक्की वाचा >> “ट्विटर East India Company सारखं वागू लागलंय, इथूनच पैसा कमावायचा आणि…”; VHP ने व्यक्त केला संताप

हे खातं कोणाचं माहिती द्या…

देसवाल यांनी वरिष्ठ वकील जी तुषार राव आणि वकील आयुष सक्सेना यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली. इन्स्टाग्रामवरुन हे फोटो तातडीने काढून टाकण्याची मागणी न्यायालयाकडे अर्जदारांनी केली होती. या प्रकरणामध्ये संबंधित खात्यासंदर्भातील माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत आहेत. असं खातं चालवणारी व्यक्ती कोण आहे तिची खरी माहिती न्यायालयासमोर आली पाहिजे असं न्यायमूर्तींनी कंपनीला सांगितलं असून खात्याशी संबंधित सर्व माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.