देशात ‘मोदी लाट’ असल्याचं लोकसभा निवडणुकांच्या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. भाजपाला या निवडणुकीत अभूतपूर्व 303 जागांवर विजय मिळाला आहे, तर भाजपाप्रणीत एनडीएचे 350 उमेदवार विजयी ठरलेत. 23 मे अर्थात मतमोजणीच्या दिवसापासूनच सोशल मीडियाला राजकारणाच्या चर्चेनं व्यापलं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. पण याशिवाय सोशल मीडियावर अजून एक नाव ट्रेंड होतंय आणि ते नाव म्हणजे प्रताप चंद्र सारंगी. ओदिशातील बालासोर येथून सारंगी विजयी ठरले आहेत. ओदिशाचे मोदी या नावाने ओदिशाची जनता त्यांना ओळखते.

24 मे रोजी ट्विटरवर सुलगना डॅश नावाच्या एका युजरने सारंगी यांचे तीन छायाचित्र शेअर केले. या छायाचित्रांमध्ये सारंगी जमिनीवर बसलेले दिसत आहेत. तसंच काही कागदपत्रं आणि सामान बॅगमध्ये व्यवस्थित ठेवताना ते दिसत आहेत. छायाचित्रांसोबत त्या युजरने, ‘हे आहेत ओदिशाचे मोदी…यांनी लग्न नाही केलंय…गेल्या वर्षीच यांच्या आईचं निधन झालं…संपत्ती नाही…एका छोट्याशा घरात राहतात…सायकल चालवतात…तळाच्या कार्यकर्त्यांचा यांना नेहमीच पाठिंबा आहे आणि आता बालासोर येथून विजयी झाल्याने ते दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत’ असं ट्विट केलं. हे ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यानंतर ट्विटरवर सारंगी यांचे निरनिराळे छायाचित्र समोर आले. नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेकांनी तर त्यांना ओदिशाचे मुख्यमंत्री बनविण्याची मागणीही केली आहे.

कोण आहेत सारंगी –
गरीब कुटुंबातून येणाऱ्या सारंगी यांचा जन्म निलगिरी येथील गोपीनाथपूर गावात झाला. 4 जानेवारी 1955 रोजी जन्मलेल्या सारंगी यांनी निलगिरी येथीलच फकीर मोहन महाविद्यालयातून पदवी घेतली. लहानपणापासूनच अध्यात्माची त्यांना बरीच आवड होती. रामकृष्ण मठामध्ये साधू बनण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांची आई विधवा असल्याचं समजल्यानंतर घरी जाऊन आईची सेवा कर असा सल्ला त्यांना तेथील लोकांकडून देण्यात आला. त्यानंतर सारंगी आपल्या गावी परतले आणि समाजसेवा सुरू केली. बालासोर आणि मयूरभंज येथील आदिवासी परिसरात त्यांनी अनेक शाळाही बांधल्या आहेत. सारंगी यांनी लग्न केलेलं नाहीये तसंच आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी जनसेवेसाठी अर्पण केलं आहे. ते एका छोट्याशा घरात राहतात आणि केवळ सायकलचा वापर करतात. त्यांच्या कुटुंबात केवळ आई होती, पण त्यांचंही गेल्या वर्षी निधन झालं.

सारंगी यांनी बिजू जनता दलाच्या रबिंद्र कुमार जेना यांचा 12 हजार 956 मतांनी पराभव केला आहे. 2014 मध्ये येथे रबिंद्र कुमार जेना विजयी ठरले होते, तर 2009 मध्ये काँग्रेसकडून श्रीकांत कुमार जेना यांनी विजय मिळवला होता. खासदार म्हणून निवडून येण्याआधी सारंगी 2004 आणि 2009 मध्ये निलगिरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून विजयी ठरले होते. त्यापूर्वी 2014 मधअये खासदारकीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.