ओला टॅक्सी चालकाने गाडीमध्ये बसलेल्या महिला प्रवाशाला कपडे काढायला भाग पाडून तिचे हवे तसे फोटो काढल्याची धक्कादायक घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. पीडित महिलेने बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांकडे मेलद्वारे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी व्ही.अरुणला (२८) अटक केली असून त्याची गाडी जप्त केली आहे. ही घटना एक जूनच्या रात्री घडली. पीडित महिलेला मुंबईला जाणारे पहाटेचे विमान पकडायचे असल्याने तिने एक जूनच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास ओला टॅक्सी बुक केली.

चालकाने टॅक्सी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने नेण्याऐवजी मध्येच मार्ग बदलला. तिने याबद्दल ड्रायव्हरकडे विचारणा केली असता त्याने पर्यायी मार्गाने आपण लवकर पोहोचू व टोलही भरावा लागणार नाही असे सांगितले. काहीवेळाने ड्रायव्हरने निर्जन रस्त्यावर टॅक्सी थांबवून गाडीचे सर्व दरवाजे लॉक केले व तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. जेव्हा तिने प्रतिकार केला तेव्हा त्याने टोळक्याला बोलवून बलात्कार करण्याची तिला धमकी दिली.

त्याने तिचा फोन खेचून घेतला व मदतीसाठी आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीला महिलेचे फोटो काढायचे होते म्हणून त्याने तिला कपडे काढायला सांगितले. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. अखेर जीवाच्या भितीने त्या महिलेने आरोपीची मागणी मान्य केली व त्याला हवे तसे फोटो काढू दिले असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीने महिलेचा फोन वापरुन तिचे फोटो काढले व तेच फोटो व्हॉटसअॅपने स्वत:च्या मोबाइलवर घेतले. त्यानंतर आरोपीने तिला तीनच्या सुमारास विमानतळावर सोडले व तक्रार केल्यास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर महिला विमानाने मुंबईला आली. त्या दरम्यान आरोपीने तिला दोनवेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने नंबर ब्लॉक केला. मुंबईत पोहोचल्यानंतर तिने बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांना सदर घडलेल्या प्रकाराचा मेल पाठवला व तक्रार पुढील कारवाईठी जे.बी.नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.