राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर व्हीआयपी आणि विद्यमान न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास तो कोर्टाचा अवमान समजला जाईल  असेही  न्यायालयाने बजावले आहे.

टोल नाक्यावर तिष्ठत राहून नंतर ओळखपत्र दाखवणे हा व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी खूपच त्रासदायक अनुभव असतो असे न्यायाधीश हुलूवाडी जी रमेश आणि न्यायाधीश एम.व्ही.मुरलीधरन यांच्या खंडपीठाने सांगितले. स्वतंत्र मार्गिकेचा विषय सोडवला नाही तर सर्व संबंधित यंत्रणांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असे न्यायालयाने सांगितले.

संपूर्ण देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी आपला हा आदेश लागू असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. व्हीआयपी आणि विद्यमान न्यायाधीशांसाठी टोल नाक्यावर स्वतंत्र मार्गिका बनवण्याबाबत गांभीर्याने विचार झाला पाहिजे असे खंडपीठाने म्हटले आहे.