मध्य ख्राईस्टचर्चमधील दोन मशिदीत झालेल्या गोळीबारानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी हा काळा दिवस असून अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही असे म्हटले आहे. जे काही आज न्यूझीलंडमध्ये घडले ते असाधारण असल्याचे जेसिंडा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या या गोळीबारात स्थलांतरीत आणि शरणार्थींचे जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. स्थलांतरीत, शरणार्थींनी न्यूझीलंडला आपले घर म्हणून निवडले आणि हे त्यांचे घर आहे असे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. न्यूझीलंडमधील जनतेला त्यांनी घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

ज्यांनी कोणी हा हिंसाचार घडवून आणला. त्यांना न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही. अशा हिंसचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात थारा नाही असे त्यांनी सांगितले. न्यूझीलंड पोलिसांनी या हिंसाचाराप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे. प्रशासनाने न्यूझीलंडमधील सर्व मशिदींना त्यांचे दरवाजे बंद करण्यास सांगितले आहे.