News Flash

‘राम रहिम सज्जन, एक आरोप मोठा की लाखो भक्तांच्या भावना?’

राम रहिम सज्जन माणूस, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो आहे

साक्षी महाराज (संग्रहित फोटो)

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांच्या बचावासाठी आता भाजप खासदार साक्षी महाराज धावून आले आहेत. बाबा राम रहिम हे सज्जन आहेत त्यांच्यावर झालेला एक आरोप मोठा आहे की, लाखो भक्तांच्या भावना? असा प्रश्न साक्षी महाराजांनी विचारला आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो मात्र न्यायालयाने फक्त तक्रार केलेल्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे, राम रहिम यांच्या लाखो अनुयायांचे का ऐकून घेतले नाही असेही साक्षी महाराजांनी विचारले आहे.

भाजप खासदार साक्षी महाराज हे आपल्या वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेतच. आजवर त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची अडचण झाली आहे. आता राम रहिम यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण यांसारखे गंभीर आरोप असतानाही साक्षी महाराज त्यांच्या मदतीला धावले आहेत.

साक्षी महाराजांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र साक्षी महाराज हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. राम रहिम यांच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोप करून त्यांची प्रतिमा धुळीला मिळविण्याचा हा डाव आहे. अत्यंत पद्धतशीरपणे साधू आणि संन्यासी यांना लक्ष्य केले जाते आहे.

एक व्यक्ती राम रहिम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करते आहे मात्र शेकडो लोक राम रहिम यांच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत हे वास्तव न्यायव्यवस्था स्वीकारणार की नाही? जामा मशिदीच्या इमामांना कोर्टात का बोलावलं जात नाही? त्यांच्याविरोधातही काही प्रकरणं दाखल झाली आहेत असेही प्रश्न साक्षी महाराजांनी उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला आहे, आता पंजाबही काँग्रेसमुक्त होईल अशीही प्रतिक्रिया साक्षी महाराजांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 10:16 pm

Web Title: one person alleging sexual exploitation but crores stand with baba ram rahim why those crores of people are not being heard
Next Stories
1 ‘डेरा सच्चा सौदा’च्या अनुयायांनी शांतता बाळगावी,पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे आवाहन
2 ‘मोबाईल वॉलेट’वरील व्यवहार तेजीत; वार्षिक उलाढाल पोहोचणार ३२ अब्ज रुपयांवर
3 राम रहिमसहित या ‘बाबां’वर लैंगिक शोषणाचे आरोप
Just Now!
X