News Flash

खाते तेथेच आज नोटाबदल

ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही शाखेत चलनबदलाची मुभा, उद्या बँका बंद

| November 19, 2016 12:37 am

ज्येष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही शाखेत चलनबदलाची मुभा, उद्या बँका बंद

जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्यासाठी बँकांसमोर लागणाऱ्या रांगा आटण्याची चिन्हे नसतानाच आता नोटबदलासाठी नागरिकांना दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. आज, शनिवारी देशभरातील सर्व बँकांमध्ये नोटबदलाचे काम होणार नाही, असे भारतीय बँक संघटनेने (इंडियन बँक असोसिएशन) शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र, या निर्णयाला ज्येष्ठ नागरिक अपवाद असतील. संघटनेच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सामान्यांना आता थेट सोमवारीच बँकेसमोर रांग लावावी लागणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या दहा दिवसांत बँकांसमोर लागलेल्या भल्या मोठय़ा रांगा हेच दृश्य देशभर होते. चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देण्याच्या कामात देशभरातील बँका गर्क होत्या. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्या शनिवार आणि रविवारीही बँका सुरू होत्या. मात्र, इतर प्रलंबित कामांची पूर्तता करण्यासाठी आज, शनिवारी बँकांमध्ये नोटबदलाचे काम होणार नाही, असे भारतीय बँक संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. परंतु ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयातून सूट देण्यात आली आहे. केवळ ज्येष्ठ नागरिकांकडूनच जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजीव ऋषी यांनी सांगितले. या निर्णयामुळे सामान्यांना मात्र आता दोन दिवस नोटा बदलता येणार नाहीत. परंतु असे असले तरी बँकांचे इतर व्यवहार सुरूच राहतील. म्हणजे पैसे भरणे आणि काढणे या दोन्ही सुविधा उपलब्ध असतील.

घोषणांचा दिलासा, मात्र..

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये काढता येतील आणि लग्नासाठी अडीच लाखापर्यंतची रक्कम काढता येईल, असा घोषणांचा दिलासा सरकारने दिला. प्रत्यक्षात अनेक बँकांमध्ये पुरेसा निधीच नसल्याने आणि नवीन नोटा पोहोचल्या नसल्याने अनेक बँकांनी आपल्याकडील निधीनुसार अनेक र्निबध स्वत:च्या अधिकारात जारी केले आहेत. त्यामुळे सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात येतच नसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.

काही राज्यांत पुढील आठवडय़ात

होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चलनबदलासाठी बँक ग्राहकांच्या बोटावर शाई वापरू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाने अर्थ मंत्रालयाला केली आहे. मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावली जाते तर चलनबदलणाऱ्या ग्राहकाच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गृहपाठ कच्चा

निश्चलनीकरणाच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने योग्य प्रकारे विचार केला नाही, असे सांगून कोलकाता उच्च न्यायालयाने या मुद्दय़ावर सरकारवर टीका केली. निश्चलनीकरणाबाबतची प्रक्रिया सरकार दररोज बदलत आहे, याचा अर्थ त्यांनी यासाठी ‘गृहपाठ’ केला नाही, असेही मत या निर्णयाविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने व्यक्त केले.

नोटाबदल टप्प्याटप्याने बंद?

चलनबदल योजनेचा लाभ काळा पैसा पांढरा करण्यासाठी घेतला जात असल्याने आता नोटा बदलून देण्याचा निर्णयच स्थगित करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याऐवजी या नोटांचा भरणा खातेदाराला खात्यात करावा लागेल. प्रथम साडेचार हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ५० दिवसांची मुदत सरकारने दिली होती. बाजारपेठेत पैसा फिरता राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एकूण साठ टक्के चलनसाठा प्रवाहित झाला असल्याने साडेचारऐवजी दोन हजार रुपयेच बदलून देण्याचा नवा र्निबध शुक्रवारी जारी झाला. आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात आल्यावर जुन्या नोटा बदलून देण्यासच स्थगिती लाभण्याची चिन्हे आहेत.

टोलमुक्तीने हजार कोटींचे ओझे

राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्राला सुमारे एक हजार कोटी रुपयांचे ओझे सोसावे लागण्याची चिन्हे आहेत. पंधरा दिवस वसुली थांबल्याने कंत्राटदारांना सरासरी मासिक वसुलीच्या आधारे नुकसानभरपाई देण्याचे घाटत आहे.

सहकारी बँकांचा बंद पुढे

नागरी सहकारी बँकांचे कोटय़वधी रुपये व्यापारी बँकांकडे असूनही व्यापारी बँकांकडून सहकार्य मिळत नसल्याने तसेच रिझव्‍‌र्ह बँकेकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने शनिवारपासून नागरी सहकारी बँकांनी बंद पुकारला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने बंद पुढे ढकलल्याची माहिती ‘महाराष्ट्र नागरी बँक फेडरेशन’ने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:37 am

Web Title: only senior citizens can exchange currency notes tomorrow
Next Stories
1 ..तर देशात दंगली होतील!
2 टोलमुक्तीने हजार कोटींचे ओझे
3 दरवर्षी ४० कोटींच्या बनावट नोटा जप्त
Just Now!
X