देशातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कर्नाटक आणि गोव्यातील राजकीय स्थितीवरुन विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला असून दिल्लीत संसद भवन परिसरात निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शनांमध्ये काँग्रेसह तृणमुल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, सीपीआय या पक्षांच्या खासदारांनी भाग घेतला आहे. त्याचबरोबर युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देखील येथे सहभाग नोंदवला.

कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरु असताना बुधवारी गोव्यातही राजकीय नाट्य घडले. यामध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांनी गोव्याच्या विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना भाजपामध्ये विलिन होत असल्याचे पत्र दिले. विरोधीपक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही घडामोड घडली.

तत्पूर्वी कर्नाटकात गेल्या शुक्रवारी राजकीय भुकंप झाला होता. तेव्हापासून अद्याप येथे राजकीय नाट्य सुरुच आहे. येथील काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र, अद्याप त्यांचे राजीनामे स्विकारण्यात आलेले नाहीत. आपले सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही.

कर्नाटकातील राजीनामा दिलेले बंडखोर आमदार सध्या मुंबईतल्या पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. या ठिकाणी आमदारांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि शिवकुमार यांनी मुंबई गाठली. मात्र, मुंबई पोलिसांनी या आमदारांना त्यांच्या विनंतीवरुन संरक्षण पुरवल्याने कुमारस्वामी आणि शिवकुमार यांची आपल्या आमदारांशी भेट होऊ शकली नाही.