इंडोनेशियामध्ये भूकंपानंतर जमीन धसल्याने अडकून पडलेल्या ५००हून अधिक गिर्यारोहकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. रविवारी पहाटे माऊंट रिन्जानी या डोंगराजवळ ६.४ रिस्टर स्केलच्या तिव्रतेचा भूकंप झाला. भुकंपाच्या झटक्यांमुळे डोंगर उतारावरील माती मोठ्या प्रमाणावर घसरून खाली आली आणि अनेक जागी जमीनही धसली. त्यामुळे ट्रेकला गेलेले ट्रेकर्स आणि हायकर्स आणि त्यांचे वाटाडे असे हजारहून अधिकजण डोंगरावर जाणारा रस्ता बंद झाल्याने अडकून पडले. अडकलेल्यांपैकी ७२३ ट्रेकर्स हे परदेशी असल्याची माहिती झिंग्वा या चीनमधील अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.

अडकलेल्या एकूण ट्रेकर्स आणि हायकर्सची संख्या सातशेहून अधिक होती. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड, थायलंड, जर्मनी, कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमधील ट्रेकर्सचे गट डोंगरावर अडकले. एवढ्या मोठ्या संख्येने ट्रेकर्स अडकल्याने तातडीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात आले. इंडोनेशियाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नगरोहो यांनी या बचावकार्याबद्दल सविस्तर महिती दिली. ‘५४३ हायकर्सला काल रात्री या डोंगराळ भागातून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.’ भूकंप आणि जमीन धसल्याने डोंगरावर जाणारे अनेक मार्ग बंद झाले असले तरी ज्या भागात जमीन धसली नाही अशा भागातील डोंगरावर जाणारे रस्ते सुरक्षित आहेत. त्याच मार्गावरून मदतकार्य केले जात असल्याचे समजते. इतर हायकर्सला सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रिन्जानी हा डोंगराळ प्रदेश जगभरातील हायकर्स आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा विषय आहे. दरवर्षी येथे हजारोच्या संख्येने पर्यटक भेट देत असल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते.