30 November 2020

News Flash

‘घुमर’वर नृत्य केल्याने शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उधळला

शाळांनी हिंदूंच्या भावना दुखावणारी गाणी वाजवू नयेत, असा आदेश काढला होता.

Padmaavat : या घटनेनंतर पोलिसांनी शाळेजवळच असलेल्या भगत सिंग पीजी महाविद्यालयातील चार तरूणांना ताब्यात घेतले. या तरूणांनी आपण करणी सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.

‘पद्मावत’ या बहुचर्चित चित्रपटातील ‘घुमर’ गाण्यावर नृत्य केल्याने मध्य प्रदेशात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ घातला. रतलाम जिल्ह्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट शाळेत सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी घुमर या गाण्यावर नृत्य केले. त्यावेळी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन खुर्च्या आणि म्युझिक सिस्टिमची तोडफोड केली.

या घटनेनंतर पोलिसांनी शाळेच्या बाजूलाच असलेल्या भगत सिंग पीजी महाविद्यालयातील चार तरूणांना ताब्यात घेतले. या तरूणांनी आपण करणी सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत झालेल्या तोडफोडीत कोणीही जखमी झालेले नाही. अटक करण्यात आलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांवर अतिक्रमण, दंगल आणि दुसऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देवास येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांनी हिंदूंच्या भावना दुखावणारी गाणी वाजवू नयेत, असा आदेश काढला होता. मात्र, याविषयी स्पष्टीकरण मागितल्यानंतर हा आदेश तात्काळ मागे घेण्यात आला होता.

चित्रपटाच्या वाटेत आलेले सर्व अडथळे आणि त्यानंतरची परिस्थिती पाहता ‘पद्मावत’च्या टीमने प्रसिद्ध वृत्तपत्रात एक भलेमोठे डिस्क्लेमर छापले असून, ते पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. ‘पद्मावत’च्या डिस्क्लेमरची सोशल मीडियावरही चर्चा पाहायला मिळाली. काही नेटकऱ्यांनी या जाहिरातीविषयी उपरोधिक ट्विटही केल्याचे पाहायला मिळाले. भल्यामोठ्या जाहिरातीच्या रुपात छापण्यात आलेल्या या डिस्क्लेमरमध्ये चित्रपटाविषयी काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

“हा चित्रपट प्रसिद्ध सुफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या ‘पद्मावत’ या महाकाव्यावर आधारित असून, हा एक काल्पनिक चित्रपट आहे. ज्यामध्ये राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील ड्रीम सीक्वेन्सचे एकही दृश्य नव्हते आणि यापुढेही नसेल. राजपूत संस्कृतीविषयी असलेला आदर, त्यांच्यात असलेली धैर्यशील वृत्ती या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा चित्रपट साकारण्यात आला आहे. या चित्रपटात प्रचंड आदबीने राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण करण्यात आले असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही’, असे या डिस्क्लेमरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 10:03 pm

Web Title: padmaavat karni sena disrupts school cultural programme over performance on ghoomar
Next Stories
1 लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या वक्तव्याने चीनचा तिळपापड
2 विहिंप नेते प्रवीण तोगडिया अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले; रुग्णालयात उपचार सुरु
3 पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी गाठला उच्चांक
Just Now!
X