जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सुरक्षा यंत्रणांनी हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांकडून तीन एके ४७ रायफल्सही हस्तगत करण्यात आल्या असून परिसरात सैन्यातर्फे अजूनही शोधमोहीम सुरु आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम राबवली. या दरम्यान तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे तिन्ही दहशतवादी हिजबूल मुजाहिदीन या संघटनेशी संबंधित आहे. सैन्याच्या कारवाईमुळे हिजबूल मुजाहिदीनला मोठा दणका बसल्याचे सांगितले जाते. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. सैन्याने या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी चकमकीविषयी सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. शुक्रवारी सीमा रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सतर्क जवानांनी उधळून लावला होता. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. मात्र बीएसएफच्या जवानांनी गोळीबारात घुसखोरीचा प्रयत्न फसला. गोळीबारात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता.१० जानेवारी रोजी बंदीपोरा जिल्ह्यातील पराय मोहल्ला हाजीन येथे एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. तर ९ जानेवारी रोजी पहाटे सीमारेषेजवळील अखनूरमधील जनरल रिझर्व्ह इंजिनीअरिंग फोर्सच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता.