पाकिस्तानने समोरासमोर लढण्याची ताकद गमावली असल्यामुळे त्यांच्याकडून सीमेवर भ्याड हल्ले केले जातात असे शरसंधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकवर केले आहे. ते कारगिलमध्ये जवानांना संबोधित करताना बोलत होते.
सीमेवर पाककडून होणाऱया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध व्यक्त करत मोदींनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तानने समोरासमोर लढण्याची ताकद गमावली असल्याचे वक्तव्य मोदींनी केले. तसेच एकेकाळी जम्मू-काश्मीरला याआधीचे पंतप्रधान क्वचितच भेट देत असत परंतु, गेल्या दोन महिन्यांत दुसऱयांदा मी काश्मीर दौऱयावर आल्याचेही मोदी म्हणाले. येथील नागरिकांना सामोऱया जाव्या लागणाऱया समस्यांशी मी परिचीत आहे. त्यामुळे येथील विकासाला चालना देण्यासाठी भविष्यात विशेष प्रयत्न केले जातील असे मोदी म्हणाले. त्यासाठी प्रकाश, पर्यावरण आणि पर्यटन या तीन शक्ती काश्मीरला समृद्ध करतील आणि काश्मीरकडे आधीच्या सरकार केलेले दुर्लक्ष विकासाने भरून काढले जाईल असेही मोदी यावेळी म्हणाले.
काश्मीरमध्ये केसर क्रांती आणण्याची गरज असून त्यातून येथील शेतकऱयाला केसर उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये नव्या चार महामार्गांच्या निर्मितीचीही घोषणा मोदींनी यावेळी केली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर दौऱयावर आहेत. यावेळी मोदींनी लेह आणि कारगिल या दोन युध्दभूमींनाही भेट दिली. त्याचबरोबर मोदींच्या हस्ते लेह-श्रीनगर वीजनिर्मिती परियोजनेचे उदघाटन करण्यात आले सोबत कारगिलमध्येही ४४ मेगावॅट वीजनिर्मिती योजनेचे उदघाटन करण्यात आले आहे.