जम्मू-काश्मीरमधील पूँछ भागात पाच भारतीय सैनिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानला जबाबदार धरून, आमचा संयम गृहीत धरू नका, अशा शब्दात सोमवारी भारताने पाकिस्तानला ठणकाविले. पाकिस्तानने केलेल्या या कृत्याचे उभय देशांच्या नातेसंबंधांवर निश्चितच विपरीत परिणाम होईल, असेही बजाविण्यात आले आह़े
आमच्या संयमाबरोबरच आमच्या सैन्य दलाच्या क्षमताही गृहीत धरू नका. आम्हीही आमच्या सीमांचे रक्षण करणे जाणतो, असे सोमवारी संरक्षणमंत्री ए़  के . अ‍ॅण्टनी राज्यसभेत म्हणाल़े  पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े  
भारताच्या सीमेत घुसून केलेल्या ६ ऑगस्टच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची विशेष तुकडी सहभागी होती हे आता सिद्ध झाले आह़े  पाक लष्कराचा पाठिंबा, साहाय्य आणि काही वेळा थेट सहभागाविना पाकिस्तानच्या सीमेतून कोणतीही हालचाल होत नाही़  हे तर आपल्या सर्वानाच माहीत आह़े  पाकिस्तानातील जे कोणी या दुर्दैवी घटनेला आणि या आधीच्या दोन जवानांच्या नृशंस हत्याकांडाला जबाबदार आहेत यांना शिक्षेविना मोकाट सोडता कामा नये, असेही ते म्हणाले.
दहशतवादी संघटना, अतिरेक्यांची जाळी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात पाकिस्तानने ठोस कारवाई करावी़  तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपींना पकडण्यासाठीही पाकिस्तानने कार्यवाही करावी, असेही अ‍ॅण्टोनी यांनी या वेळी बजावल़े
अतिरेक्यांनी पाक लष्कराच्या वेशात हल्ला केल्याचे वक्तव्य करणाऱ्या अ‍ॅण्टोनी यांना चौफेर टीकेचे धनी व्हावे लागले होत़े  मात्र आपले तेव्हाचे वक्तव्य तत्कालीन माहितीच्या आधारे केलेले होते, असे सांगत सोमवारी त्यांनी बाजू मारून नेण्याचा प्रयत्न केला़