News Flash

हाफिज सईद, मसूद अझहरशी संबंधीत ११ संघटनांवर पाकिस्तानात बंदी

पाक सरकारने अॅन्टी टेररिझम अॅक्ट अंतर्गत जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधीत ११ संघटनांवर बंदी घातली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता त्याच्यासह पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या दहशतवादी गटांवर आणि त्यांच्या कारभारांवर निर्बंध आणण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय राहिलेला नाही. त्यानुसार, मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद आणि पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार मसूद अझहर यांच्याशी संबंधीत ११ संघटनांवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. भारताच्या कुटनीतीमुळे या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात भारताला यश आले आहे.

पाकिस्तानच्या इंटिरिअर मिनिस्ट्रीने अॅन्टी टेररिझम अॅक्ट (एटीए) अंतर्गत जमात-उद-दावा (जेयुडी) आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) आणि जैश-ए-मोहम्मदशी (जेईएम) संबंधीत ११ संघटनांवर बंदी घातली आहे. हिंदुस्तान टाइम्सने पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

पाकिस्तानच्या मंत्रालयाने काढलेल्या बंदी आदेशात अल अनफल ट्रस्ट (लाहोर), इदारा-ए-खिदमत खलाक (लाहोर), अल दावतुल इर्शाद (लाहोर), अल हमद ट्रस्ट (लाहोर आणि फैझलाबाद), अल फझल फाऊंडेन-ट्रस्ट (लाहोर), मॉस्क अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट (लाहोर), अल मदिना फाऊंडेशन (लाहोर), मौज बिन जबल एज्युकेशन ट्रस्ट (लाहोर), अल इझर फाऊंडेशन (लाहोर), अल रेहमत ट्रस्ट ऑर्गनाय़झेशन (बहावलपूर) आणि अल फुर्कान ट्रस्ट (कराची) या संघटनांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय कृती कार्यक्रमानुसार, या संघटनांवर बंदीबाबत निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानातील पेशावरमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १३३ चिमुकल्यांना जीव गमवावा लागल्यानंतर दहशतवादाविरोधात लढ्यासाठी पाकिस्तानात २५ डिसेंबर २०१४ रोजी २० मुद्द्यांना अनुसरुन राष्ट्रीय कृती कार्यक्रम आखण्यात आला. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत पाकिस्तानी सरकारने या संघटनांवर बंदी घालण्याबाबत ठराव केला होता. या संघटनांवर २००२ साली पाकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही बंदी घातली होती.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा प्रश्न प्रकर्षाने मांडल्याने आपल्या कुटनीतीला यश आले आणि मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केले. तत्पूर्वी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर हाफिज सईदलाही १० डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 7:09 pm

Web Title: pakistan bans 11 organisations linked to jud jem
Next Stories
1 भाजपाच्या राज्यांतील दलित अत्याचारांबाबत कारवाईचे काय?; मायावतींचा मोदींवर पलटवार
2 संबित पात्रा पावसाळी बेडकासारखे – सिद्धू
3 ‘सपा-बसपाला रोड रोमियोंना हाताळता येईना, दहशतवादाविरोधात कसे लढणार?’
Just Now!
X