काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मला पदावरून हटविण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असतानाच जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली. पाकिस्तान कधीही कट रचत नाही, असे फारुख अब्दुल्लांनी म्हटले आहे.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. पाकिस्तान या निवडणुकीत हस्तक्षेप करतात, काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांची भेट घेतात. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मला पदावरून हटविण्यासाठी सुपारी घेतली, असा दावा मोदींनी केला होता. मणिशंकर अय्यर यांनी मोदींविषयी अपशब्द वापरल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आणि शेवटी पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी टीकास्त्र सोडले.

मंगळवारी संसदेबाहेर पत्रकारांनी फारुख अब्दुल्लांना गुजरात निवडणुकीबाबत काँग्रेसने पाकशी चर्चा केल्याचा आरोप भाजपने केला, यावर तुमचे मत काय असा प्रश्न विचारला. यावर फारुख अब्दुल्ला म्हणाले, नरेंद्र मोदी स्वतःच पाकिस्तानमध्ये जेवायला गेले होते. पाकिस्तान कधी कट रचत नाही, असा दावाही त्यांनी केला.

हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होत असते. यंदा अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपचा विजय झाला. यात नवे काहीच नाही, असे अब्दुल्लांनी सांगितले. काँग्रेसच्या एका नेत्याने बेजबाबदार विधान केल्याने गुजरातमध्ये त्यांचा पराभव झाला. पण गुजरातमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली, असेही त्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोदी यांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा पुढे आणला होता. पाकिस्तानचा हस्तक्षेप, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली बैठक व त्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची उपस्थिती यावरुन भाजपने रान उठवले. मतांच्या ध्रुवीकरणाकरिता मोदी आणि भाजपने पाकिस्तानचा पुरेपूर वापर करून घेतला होता. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान झाले. त्यात भाजपला ५१ जागा मिळाल्या.