अल- कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनची माहिती देणाऱ्या डॉक्टरच्या यातना काही थांबलेल्या नाही. गेल्या सात वर्षांपासून डॉ. शकील आफ्रिदी तुरुंगात असून जवळपास दोन वर्ष आफ्रिदींविरोधातील खटल्याची फाईल ‘गहाळ’ झाली होती.

क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला पकडण्यासाठी डॉ. शकील आफ्रिदी यांनी ‘सीआयए’ला मदत केली होती. अबोटाबादमध्ये लादेन लपून बसलेल्या भागात आफ्रिदी यांनी बनावट लसीकरण मोहीम राबवली होती. याद्वारे लादेनच्या डीएनएचे नमुने गोळा करण्याचा हेतू होता. ओसामाला ठार मारल्यानंतर आफ्रिदी यांनीच अमेरिकेला मदत केली, असे समोर आले होते. मात्र, तिथून आफ्रिदींना मनस्तापाचा सामना करावा लागला.

आफ्रिदी यांना अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोह अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. ओसामा प्रकरणात मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला नाही. तर ‘लष्कर-ए-इस्लाम’ या संघटनेशी संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.  २०१२ पासून आफ्रिदी यांना खटला लढवण्यासाठी वकीलच देण्यात आलेला नाही. तुरुंगात त्यांना पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्यच भेटायला आल्याची नोंद आहे. तुरुंगात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना एकटे ठेवण्यात आले आहे.  तब्बल दोन वर्ष आफ्रिदी यांच्याशी संबंधित खटल्याची फाईल गहाळ झाली होती, असे समजते. आफ्रिदी यांच्यावरील कारवाईनंतर अमेरिकेने याबाबत पाककडे पाठपुरावा केला. सध्या अमेरिका आणि पाकमधील संबंध तणावपूर्ण असून नुकत्याच दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत आफ्रिदी यांच्या सुटकेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी आफ्रिदीचा विसर पडलेला नाही, असे स्पष्ट केले. आम्ही पाकिस्तानला आमची भूमिका सांगितली आहे. आफ्रिदी यांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

४ मे २०१२ रोजी आदिवासीबहुल प्रांतातील राजकीय दूताने ३७ वर्षीय डॉ. आफ्रिदी यांना ३३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. आफ्रिदी यांच्या सुटकेसाठी मानवी हक्क संघटनांनी देखील मोहीम राबवली होती.