पाकिस्तान तालिबानने शीख राजकीय नेत्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असतानाही, निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या हिंदू प्रतिस्पध्र्याने एका प्रमुख शीख राजकीय नेत्याची भाडोत्री मारेकऱ्यांमार्फत गेल्या आठवडय़ात हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे स्वात जिल्हा नेते बलदेव कुमार यांना पोलिसांनी त्याच पक्षाचे नेते डॉ. सरदार सूरणसिंग यांच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून अटक केली. डॉ. सिंग हे खैबर-पख्तुन्वाच्या मुख्यमंत्र्यांचे अल्पसंख्य व्यवहार विभागाचे विशेष साहाय्यक होते.

डॉ. सिंग यांची हत्या करण्यासाठी बलदेवकुमार यांनी मारेकऱ्यांना एक दशलक्ष रुपये खंडणी देण्याचे आश्वासन दिले होते. बलदेवकुमार यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, डॉ. सिंग हे बलदेवकुमार यांच्या तुलनेत पक्षात नवे होते, असे पोपील उपमहानिरीक्षक आझाद खान यांनी सांगितले.

डॉ. सिंग यांची हत्या करण्यासाठी बलदेवकुमार यांनी आपले मित्र मोहम्मद आलम याची मदत घेतली. आलम याने सइज जान याच्यासमवेत योजना आखली आणि एक दशलक्ष रुपये देण्याचे आश्वासन दिले व त्यापैकी दोन लाख रुपये अग्रीम म्हणून दिले. सईद जान याने मुख्तार आणि बेहरोज खान या भाडोत्री मारेकऱ्यांना तयार करून त्यांना बुनेर पीर बाबा येथे डॉ. सिंग यांना मारण्यासाठी पाठविले.

त्यानंतर मुख्तार आणि बेहरोज खान यांनी गेल्या शुक्रवारी डॉ. सिंग यांना पीर बाबा परिसरात गाठले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची खबर मिळताच पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली. पैशांच्या मोबदल्यात डॉ. सिंग यांची हत्या केल्याचे हल्लेखोरांनी चौकशीदरम्यान मान्य केले.

त्यानंतर सईद जान याला पकडण्यात आले आणि त्याच्या चौकशीवरून आलम आणि बलदेवकुमार यांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असली तरी पोलिसांनी ती फेटाळली.