इस्लामाबाद : आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) पॅरिसमध्ये १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत पाकिस्तानचा ‘करडय़ा यादी’तील समावेश कायम ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा करडय़ा यादीत समावेश करण्यात आला त्या वेळी ‘एफएटीएफ’ने ४० शिफारशी केल्या होत्या, मात्र त्यापैकी केवळ एकाच शिफारशीचे पालन पाकिस्तानने केले. त्यामुळे त्या देशाला करडय़ा यादीतच ठेवले जाण्याची शक्यता वर्तवणारे वृत्त आशिया-पॅसिफिक गटाने (एपीजी) दिले आहे.

‘एपीजी’ने शनिवारी आपला बहुप्रतीक्षित २२८ पानांचा ‘म्युच्युअल इव्हॅल्युएशन’ अहवाल सादर केला. ‘एफएटीएफ’ची या महिन्यात एक महत्त्वाची बैठक होणार असून तीत पाकिस्तानच्या करडय़ा यादीच्या दर्जाबाबत निर्णय होणार आहे.

गेल्या जूनमध्ये पाकिस्तानला करडय़ा यादीत टाकण्यात आले होते. त्या वेळी त्यांना एक कृती योजना देऊन ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते.  आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्यास आळा घालण्यासाठी ‘एफएटीएफ’ने दिलेल्या ४० शिफारशींपैकी केवळ एकाच शिफारशीची पाकिस्तानने पूर्तता केल्याचे ‘एपीजी’ने म्हटले आहे.