नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शरीफ मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण स्विकारून उपस्थित राहणार का? याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. शरीफ येणार की नाही, हे गुरुवारी स्पष्ट होईल.
दरम्यान, मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण न स्विकारण्याचे कोणतेही कारण नाही. दोन्ही देशांतील संबंधांना बळकटी आणण्याची पक्षाची भूमिका राहीली आहे. तसेच दोन्ही देशांतील व्यावसाय आणि व्यापारवाढ व्हावी यासाठी शरीफ यांचे नेहमी प्रयत्न राहीले आहेत. असे नवाज शरीफ यांच्या पीएमएल (एन) या पक्षाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला विराजमान होत आहेत. २६ तारखेला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना मंत्रिपदाची शपथ देतील.
राष्ट्रपती भवनाच्या आवारातील हिरवळीवर होणाऱया या समारंभासाठी सार्क देशांतील राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला. त्याप्रमाणे पाकिस्तानसह अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठविण्यात आले होते. त्यापैकी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई आणि श्रीलंकचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष हे यांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारले असून, ते या सोहळ्यासाठी येणार आहेत. नवाझ शरीफ या सोहळ्याला येणार की नाही, हा आता औत्सुक्याचा विषय बनला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील पुढील काळातील संबंधांच्या दृष्टीने या हालचालींकडे बघितले जात आहे. जर शरीफ येणार नसतील, तर ते पाकिस्तानी सरकारमधील एखाद्या नेत्याला आपला दूत म्हणून या सोहळ्यासाठी पाठविण्याची शक्यता आहे. शरीफ स्वतः या सोहळ्यासाठी आले तर भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी येणारे ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान असतील.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या २६ मे रोजी जपानच्या दौऱयावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी या सोहळ्यासाठी बांगलादेशमधील संसदेचे सभापती शिरिन शर्मिन चौधरी उपस्थित राहणार आहेत.