पाकिस्तान पार्लमेण्टचे संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर चालविण्यात येत असून सौरऊर्जेवर कामकाज चालणारी ती जगातील पहिली पार्लमेण्ट ठरली आहे. या मोहिमेला चीनकडून ५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य मिळाले आहे.

पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अत्यंत साध्या समारंभात पार्लमेण्टच्या इमारतीमधील सौरऊर्जेची कळ दाबून ही सेवा सुरू केली. या बाबत २०१४ मध्ये घोषणा करण्यात आली होती आणि मित्रत्वाच्या संबंधातून चीनने त्यासाठी ५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य केले.

सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण ठरणारी ही जगातील पहिलीच पार्लमेण्ट आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अन्य संस्थांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे, असे नवाझ शरीफ या वेळी आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले.

चीनचे पंतप्रधान क्षी जिनपिंग गेल्या वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी पार्लमेण्टमध्ये भाषण करताना या बाबतचे भाष्य केले होते. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी चीनने ५५ दशलक्ष डॉलरचे आर्थिक साहाय्य केले आहे. पाकिस्तान आणि चीनमधील मैत्रीचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे शरीफ म्हणाले.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष अयाझ सादिक म्हणाले की, पार्लमेण्टमधील सौरऊर्जा प्रणाली ८० मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती करणार आहे. या वेळी पाकिस्तानातील चीनचे राजदूत उपस्थित होते. पार्लमेण्टचे कामकाज चालण्यासाठी ६२ मेगाव्ॉट विजेची गरज असून उर्वरित १८ मेगाव्ॉट वीज राष्ट्रीय ग्रीडमध्ये देण्यात येणार आहे.