काश्मीरप्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. हाच मुद्दा लक्षात घेऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत परराष्ट्र नीती ठरवणारे अधिकारीही सहभागी झाले होते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या वाढत्या मैत्रीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पाकिस्तानी रेडिओने दिल्याचे समजते आहे.

आजवर पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आली आहे. तसेच भारतात घुसखोरीही करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर तणाव कायम आहे. दोन्ही देश याबाबत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. मात्र यातून काय मार्ग काढायचा यासाठी ही चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीन या आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हा मुद्दाही या बैठकीत चर्चेला आला होता. शुक्रवारीच जम्मू काश्मीर भागातल्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताच्या चौक्या यामध्ये उद्धवस्त करण्यात आल्या. ज्यानंतर भारतानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख उत्तर दिले. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध आणखी ताणले गेले आहेत.

त्यात भारताने अफगाणिस्तानसोबत केलेली मैत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पाकिस्तानला भरलेली धडकी.. याचमुळे ही बैठक बोलावली गेल्याची चर्चा रंगते आहे. पाकिस्तान हा कुरापती काढण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारा देश आहे. पाकिस्तानला चीनची साथ लाभते आहे, त्यामुळे भारतविरोधी कारवाया करण्याची हिंमत ते करत आहेत. अशात आता अफगाणिस्तान आणि अमेरिका यांच्यासोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबंध पाकिस्तानला खटकत आहेत. त्याचमुळे ही उच्चस्तरीय बैठक बोलावून नवाझ शरीफ हे पुढची रणनीती आखत असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसात पाकिस्तानने भारतात २३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारताने ठोस उत्तर द्यावे अशी भारतीय जनतेची सरकारकडून अपेक्षा आहे.