पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद शहरात शांततामय मार्गाने स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी निघालेल्या मोर्चावर पाकिस्तानी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्यामध्ये दोन नागरीकांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. ‘काळा दिवस’ म्हणून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील वेगवेगळया पक्षांनी एआयपीएच्या छत्राखाली शांततेच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता.

१९४७ साली आजच्याच दिवशी पाकिस्तानी फौजांनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. ७२ व्या घुसखोरी दिनाचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणून नागरीक मोठया संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांना पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने करण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पाकिस्तान पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या व लाठीचार्ज केला.

पीओके आणि गिलगीट, बालटिस्तानमधील जनता २२ ऑक्टोंबर काळा दिवस पाळते. पाकिस्तानने आपल्या प्रदेशातून निघून जावे अशी त्यांची मागणी आहे. मागच्यावर्षी २२ ऑक्टोंबरला मुझफ्फराबाद, रावळकोट, कोटली आणि गिलगीट या भागात स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले होते.