काश्मीरमधील दंगलींमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका वृत्त वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना पाकिस्तान कॅशलेस फंडिंग करत असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. पाकने यापूर्वीही अनेकवेळा हे आरोप फेटाळले आहेत. या वाहिनीने गोपनीय सूत्रांचा हवाला दिला असून पाकने यासाठी वस्तू विनिमय प्रणालीचा अवलंब केल्याचे सांगण्यात येते. पूर्वीच्या काळी या पद्धतीने व्यापार चालायचा.

वस्तू विनिमय प्रणालीत लोक एका सामानाच्या बदल्यात त्याच किमतीच्या दुसऱ्या साहित्याची देवाण-घेवाण करत. बहुतांशवेळा अनेक ट्रक पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) मुझफ्फराबादवरून श्रीनगरला साहित्य घेऊन येतात. याच ट्रक मधील साहित्याच्या माध्यमातून काश्मीरमधील दंगेखोरांना पैसे दिले जातात. मुझफ्फराबादहून येणाऱ्या ट्रकमध्ये पाच लाखांचे सामान असल्याचे गृहित धरल्यास, जेव्हा हा ट्रक श्रीनगरहून मुझफ्फराबादला परतेल तेव्हा त्या ट्रकमध्ये २ लाखांचे सामान असेल. या पद्धतीने ३ लाखांचे सामान श्रीनगरमधील दंगेखोरांपर्यंत पोहोचवले जाते.
दरम्यान, सैन्य दलाच्या जीपवर एका काश्मीरी युवकाला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखी दोन व्हिडिओंची चर्चा मोठ्याप्रमाणात सुरू झाली आहे. यातील एका व्हिडिओत लष्कराचे जवान सैन्य दलाच्या वाहनात एका युवकाची बेदम मारहाण करताना दिसत आहेत. ते त्या युवकाला पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यास सांगत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. दुसऱ्या व्हिडिओत लष्कराचे चार जवान पुलवामा महाविद्यालयात एका विद्यार्थ्याला जमिनीवर पाडून त्याला मारहाण करताना दिसत आहेत. हे व्हिडिओ कुणी बनवलेत ते अद्याप समजू शकलेले नाही.