पाकिस्तानने चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या १६ वर्षीय भारतीय मुलाला पुन्हा भारतात पाठवले आहे. दोन दिवसांपूर्वी या मुलाला वाघा बॉर्डरवरुन भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा मुलगा मागील वर्षी चुकून पाकिस्तानमध्ये गेला होता. या मुलाचे नाव बिमल नारजी असून तो आसामचा आहे. पाकिस्तानी लष्कराने या मुलाला बीएसएफ जवानाकडे सोपवले. हा मुलगा चुकून पाकिस्तानमध्ये गेला असला तरीही त्याच्या सर्व कागदपत्रांची योग्य ती तपासणी करुन योग्य त्या चौकशीनंतरच त्याला लष्कराकडे सोपवण्यात आले आहे.

मागील वर्षी भारतीय लष्कराकडून मोहम्मद इमरान कुरेशी वारसी आणि अब्दुल्ला अटारी यांना २०१७ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. बऱ्याच चौकशीनंतर त्यांना मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारताने पाकिस्तानला पाठवले. वारसी २००३ मध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आले होते. चार वर्षे भारतात राहिल्यानंतर वारसी यांचा विसा संपला होता. मात्र तरीही ते भारतात वास्तव्य करत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान वारसी यांनी भारतीय मुलीशी लग्न केले. अशाप्रकारे विसा संपलेला असताना भारतात राहील्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र चौकशीनंतर त्यांना पाकिस्तानकडे सोपवण्यात आले.