पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे चर्चवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असून १६ जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दुसऱ्या दहशतवाद्याने स्वतःला बॉम्बने उडवून दिले.

क्वेट्टा येथे बेथेल मेथेडिस्ट चर्च असून या चर्चवर रविवारी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यादरम्यान पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. दहशतवाद्यांना वेळीच रोखल्याने त्यांना चर्चच्या आत प्रवेश करता आला नाही. चर्चच्या मुख्य इमारतीपासून ४०० मीटर अंतरावरच त्यांना रोखल्याने अनर्थ टळला, असे बलुचिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी किमान ३०० ते ४०० जण येतात, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

चर्चचा परिसर खाली करण्यात आली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु आहे. परिसरातील सर्व रुग्णालयांना हायअलर्ट जारी करण्यात आल्याचे बलुचिस्तानच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रेही होती, असे समजते. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.