पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी भारताने केलेली मोर्चेबांधणी अयशस्वी ठरली आहे. याच संदर्भात पाकिस्तानमधील एका पत्रकाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हमीद मीर या पत्रकाराने ‘जैश-ए-मोहम्मद’चा मोहरक्या मसूद अझहरची तुलना नोबेल पुरस्कार विजेते तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्याशी केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीत मसूदला दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावाला चीनने नकाराधिकार वापरल्यानंतर हमीद यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीत मसूर अझहरविरोधातील प्रस्तावात आडकाठी का घातली हे समजून घेणे सोपे आहे. मागील अनेक दशकांपासून भारताने चीनचा शत्रू असणाऱ्या दलाई लामा यांना आश्रय दिला आहे.’

हमीद यांच्या या ट्विटवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. विचारवंत आणि लेखक असणाऱ्या तारेख फतेह यांनीही हमीद यांना फैलावर घेतले आहे. तुम्ही नावाजलेले पत्रकार आहात तुम्हाला हे शोभत नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पेशाने वकील असणाऱ्या अमृता बिंदर यांनी केलेल्या ट्विटमध्ये ‘मसूद अझहर हा दहशतवादी आहे तर दलाई लामा हे मलालाप्रमाणे नोबेल पुरस्कार विजेते आहेत’, असं म्हटलं आहे.

लामा हे जगातील चौथ्या सर्वात मोठ्या धर्माचे धर्मगुरु आहेत

ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा आणि तुमचे पंतप्रधान जातात तेव्हा

अशी तुलना एखादा वेडाच करु शकतो

ओसामा संत होता

मग चीन का प्रस्ताव आणत नाही

तुम्हाला बरच काही शिकायचं आहे

पत्रकारिता सोडा आणि जिलेबी तळा

असू द्या तुमच्याकडून नाही होणार

दरम्यान, मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाची मुदत १३ मार्चला संपणार होती. त्याआधीच भारताने अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटून मोर्चेबांधणी केली होती. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने या वेळी त्याला वेगळे महत्त्व होते. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टन येथे अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेऊन चर्चा केली होती, त्यात दहशतवादाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताच्या मोर्चेबांधणीला यशही आले होते. १० हून अधिक देशांनी या प्रस्तावात भारताची साथ दिल्याचे समजते. पण चीनने खोडा घातल्याचे समोर आले आहे. नकाराधिकाराचा वापर केल्याची ही चौथी वेळ आहे. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानसोबत चीनचे चांगले संबंध आहे. यापूर्वी चीनने अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर २००९, २०१६, २०१७ असा तीनदा नकाराधिकार वापरला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही चीनचा निर्णय निराशाजनक असल्याचे आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.