उधमपूरजवळ बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणाऱय़ा दहशतवाद्यांचे मूळ लक्ष्य वेगळेच होते. त्यांना अचानकपणे सीमा सुरक्षा दलाचे जवान निघालेली गाडी दिसल्यामुळे त्यांनी त्यावर गोळीबार केला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जम्मू विभागाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी गुरुवारी दिली.
दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये बुधवारी सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले होते. तर आठ जवान जखमी झाले. या हल्ल्यात जवानांनी दहशतवाद्यांना तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये एक दहशतवादी जागीच मारला गेला. तर दुसऱय़ा दहशतवाद्याला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली.
राकेश शर्मा म्हणाले, सीमा सुरक्षा दलाच्या गाडीवर हल्ला करण्याचे दहशतवाद्यांचे मूळ लक्ष्य होते, असे वाटत नाही. ते दुसऱया कोणत्यातरी ठिकाणी हल्ला करण्यासाठी आले होते. मात्र, अचानक त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची गाडी दिसली आणि त्यांनी त्यावर हल्ला केला. हे दोन्ही दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी आले होते का, याची माहिती पोलीसांनी पकडलेल्या दहशतवाद्याकडे चौकशी केल्यावरच मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.