आम्ही सामंजस्य, शांतता आणि चर्चेने सीमावादावर मार्ग काढायला तयार आहोत, असे चीन दाखवत आहे. पण प्रत्यक्षात पँगाँग टीएसओ क्षेत्रातील वाद सोडवण्यासाठी चीनने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शु्क्रवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्या्ंची भेट घेऊन पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

पूर्व लडाखमधील काही भागांमध्ये भारत आणि चीन दोघांनी आपपाले सैन्य मागे घेतले आहे. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्रामध्ये परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. तिथे परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. य़ाच तलाव क्षेत्रातील हद्दीवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे. पाच आणि सहा मे रोजी याच तलावाच्या किनाऱ्यावर दोन्ही देशांचे सैनिक परस्परांना भिडले होते. त्यानंतर पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांनी आपापले सैन्य तैनात केले.

या भागातील अन्य पाँईंटसबद्दल भारताची भूमिका चीनने स्वीकारली. पण पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राबद्दल त्यांना भारताची भूमिका मान्य नाही तसेच त्यांनी यावर कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. सहा जूनला झालेल्या लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्यावेळी सुद्धा पँगाँग टीएसओबद्दल चीनची भूमिका अनुकूल नव्हती भारतीय लष्करातील सूत्रांनी शुक्रवारी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली. पँगाँग टीएसओ क्षेत्रात फिंगर फोर पलीकडे भारताने गस्त घालणे चीनला मान्य नाही.

भारताची काय मागणी आहे?
मागच्या आठवडयात शनिवारी लेफ्टनंट जनरल स्तरावर पहिली बैठक झाली होती. त्यावेळी सुद्धा दोन्ही देशांचे सैन्य थोडे मागे हटले होते. तीन ठिकाणाहून सैन्य मागे घेतले असले तरी पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. हाच भाग संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दोन्ही बाजूंकडून तिथे कुठलीही हालचाल झालेली नाही.

मे महिन्यापासून भारतीय सैन्याची गस्त बंद करण्यासाठी चिनी सैन्याने फिंगर ४ टू फिंगर ८ या भागावर नियंत्रण मिळवले आहे. स्थानिक पातळावर दोन्ही देशांमध्ये मतभेदांचे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यावर एकमत होणे आवश्यक आहे. पूर्व लडाखमधील पँगॉग, गालवान व्हॅली आणि अजून दोन भागांमधून चीनने आपलं सैन्य मागे घ्यावं, फिंगर ४ टू फिंगर ८ भागामध्ये बांधलेले बंकर चीनने नष्ट करावेत तसेच चीनने या भागात तैनात केलेले ५ ते ७ हजार सैनिक, तोफा, रणगाडे मागे घेतले पाहिजे या भारताच्या प्रमुख मागण्या आहेत.