बँकेतील एखादा घोटाळा समोर येणे हे आता म्हणावे तितके नवीन राहीले नाही. पण दिवसागणिक या घटनांमध्ये भर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकताच पंजाब नॅशनल बँकेतील एक मोठा घोटाळा समोर आला असून मुंबईतील बँकेच्या एका शाखेतून 11,300 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र इतक्या जास्त रकमेचा व्यवहार नेमका कोणाकडून करण्यात आला आहे त्याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हे व्यवहार काही खातेधारकांच्या फायद्यासाठी कोणाकडून तरी मुद्दामहून करण्यात आल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे. त्यानुसार इतर बँकांकडून आगाऊ रक्कम घेण्यात आल्याचे बँकेचे म्हणणे आहे. कर्जवितरणाच्या बाबतीत पंजाब नॅशनल बँक ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची तर एकूण मालमत्तेच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाची बँक आहे. या घोटाळ्याबाबत मुंबईतील बँकेचे अधिकारी म्हणाले, ”बँकेत अशाप्रकारे समोर येणारे व्यवहार हे गुंतागुंतीचे असतात, त्यामुळे या गोष्टीची योग्य ती चौकशी करुन मगच त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे योग्य होईल. तसेच या व्यवहाराबाबतची संपूर्ण माहिती चौकशीनंतर समोर येईल, त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही.”

याआधीही पंजाब नॅशनल बँकेमध्ये काही अनियमित व्यवहार झाल्याने त्यांची चौकशी झाली होती. यावेळी ज्वेलर्सचा व्यवसाय असणाऱ्या देशातील श्रीमंतांपैकी निरव मोदी यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी २८२ कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे आताचा घोटाळा हा खूप जास्त रकमेच्या असल्याने बँकिंग क्षेत्रातील सर्वांसाठीच ही मोठी घटना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप या घोटाळ्यात कोणाचेही नाव समोर आलेले नाही. या वृत्ताचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. बँकेच्या शेअरचा भाव बुधवारी जवळपास पाच टक्क्यांनी घसरला.