‘पनामा पेपर्स’मुळे जगभरातील श्रीमंतांची करचोरी आणि काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग उजेडात आल्यानंतर आता ‘पॅराडाईज पेपर्स’ प्रकरणामुळे जगभरात भूकंप झाला आहे. यामधून भारतसह जगभरातील अनेक बडे नेते, उद्योगपती, कलाकारांची नावे पुढे आली आहेत. यामध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे. भारतातील अनेक बड्या कंपन्या आणि श्रीमंती व्यक्ती यांची करचोरी ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आली आहे.

जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील ९६ नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पार पाडले. यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीला १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. ११९ वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचे एक मोठे नेटवर्क आहे. या संस्थेकडून भारतासह जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. करचोरी केलेला पैसा देशाबाहेर पाठवून काळा पैशाचे रुपांतर पांढऱ्या पैशात करणाऱ्या भारतीयांची संख्या ७१४ इतकी आहे. यामध्ये भारत जगात १९ व्या क्रमांकावर आहे.

अॅपलबाय या कंपनीची दुसरी सर्वात मोठी ग्राहक असलेली कंपनी भारतीय आहे. या कंपनीचे नाव ‘सन ग्रुप’ असे असून, ती नंदलाल खेमका यांच्या मालकीची आहे. अॅपलबायच्या भारतीय ग्राहकांचा विचार केल्यास त्यामध्ये बड्या कंपन्या आणि अनेक श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मधून केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा, बिग बी अमिताभ बच्चन, भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि उद्योगपती आर. के. सिन्हा, उद्योगपती विजय मल्ल्या, अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांची नावे पुढे आली आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा राजकारणात येण्यापूर्वी त्यांची ओमिड्यार नेटवर्कमध्ये भागीदारी होती, अशी माहिती ‘पॅराडाईज पेपर्स’मधून समोर आली आहे. तर अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचे यातून उघड झाले आहे. याशिवाय भाजपचे राज्यसभेतील खासदार आर. के. सिन्हा यांनीदेखील करचोरी करुन पैसा परदेशात पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त तिच्या दिलनशी या जुन्या नाव्याने करचोरी करत असल्याचेही यातून उघडकीस आले आहे.