पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार बेल्जियमचा अब्देलहमीद अबौद हा आहे, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असून तो सीरियात असल्याचे समजते.
पॅरिसमध्ये हल्ले झाल्यानंतर रातोरात अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले होते. पॅरिसमधील हल्ल्यात १२९ जण ठार झाले आहेत. अभियोक्तयांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकऱ्यांपैकी एकाला ग्रीसमध्ये गेल्या महिन्यात थांबवून त्याचे बोटांचे ठसे घेण्यात आले होते, त्यामुळे आयसिसने हा हल्ला केल्याच्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे. अंतर्गत सुरक्षा मंत्री बेर्नार्ड काझनेवी यांनी सांगितले की, १६८ ठिकाणी छापे टाकून २३ जणांना अटक केली असून १०४ जणांना नजरकैद करण्यात आले आहे. ही केवळ सुरूवात आहे. कारवाई आणखी सुरूच राहणार आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या दोन मोटारी या ब्रसेल्समधून घेतलेल्या होत्या, त्या बेल्जियम पोलिसांनी शोधून काढल्या आहेत. ब्रसेल्स येथे सात जणांना अटक करण्यात आली असून कटात सामील असलेल्या तीन भावांपैकी एकाचा शोध सुरू आहे. बेल्जियममध्ये जी चौकशी सुरू आहे त्यातील माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सीरियात असलेला अब्देलहमीद अबौद या कटाचा सूत्रधार असून तो सीरियात आहे, त्यानेच युरोपात असे अनेक हल्ले करण्याचा कट आखला आहे. फ्रेंच अभियोक्तयांनी दिलेल्या माहितीनुसार सात आत्मघाती हल्लेखोरांपैकी पाच जण शुक्रवारीच मरण पावले आहेत. त्यात चार फ्रेंच होते व पाचवा ऑक्टोबरमध्ये ग्रीसला आला व तेथून तो फ्रान्ममध्ये आला. तो सीरियन असावा. फ्रान्सच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनंतर किमान पाच हल्ले तरी रोखण्यात यश आले आहे. ब्रसेल्स येथे मोलेनबीक येथे संशयितांना पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत. तीन संशयितांना शनिवारी अटक करण्यात आली होती. सोमवारी पुन्हा सकाळीच कारवाई सुरू झाली.
पकडले पण समन्वयाअभावी सोडून दिले
हल्ल्यानंतर फ्रान्सच्या पोलिसांनी एका संशयिताला पकडून जाबजबाबानंतर पुन्हा सोडून दिले, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा शोध घेतला जात आहे. सलेह अब्देलस्लाम असे त्याचे नाव असून त्याचा मोटारीजवळ असलेल्या तिघांमध्ये समावेश होता. शनिवारी ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले, अब्देसलाम हा फोक्सव्ॉगन पोलो गाडी भाडय़ाने देणारा असावा व त्याच गाडीच्या मदतीने पॅरिसमध्ये हल्ले करण्यात आले. फ्रान्सच्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात का घेतले नाही हे समजू शकलेले नाही. त्याची ओळख त्यांनी तपासली पण त्याचा हल्ल्याशी काही संबंध असावा याची पोलिसांना माहिती नव्हती. ती साधी वाहतूक पोलिसांकडून होणारी तपासणी होती असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्या वेळी अब्देसलामचे नाव इतर पोलिसांनी यंत्रणेमार्फत जाहीर केले होते का, यावर काहीही स्पष्टीकरण देता आलेले नाही. हल्ल्याच्या एक दिवस अगोदर इराकी गुप्तचर अधिकाऱ्यांनी फ्रान्स व अमेरिका आघाडीतील देशांना आयसिस हल्ला करणार असल्याची सूचना दिली होती. आयसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने बंद्रुका, बॉम्ब वापरून लोकांना ओलिस ठेवण्यास सांगितले होते, इराण-रशिया व फ्रान्स या देशांमध्ये असे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण नेमका कुठे व केव्हा हल्ला होणार याची काहीही सूचना नव्हती. इराकी अधिकाऱ्यांच्या मते त्यांनी नेमकी माहिती दिली होती व स्लीपर सेलचे अतिरेकी फ्रान्समध्ये सीरियातील रक्का येथून पाठवल्याचे त्यात नमूद केले होते, पण इराकी गुप्तचरांनी सगळा तपशील दिलाच नव्हता, असा दावा फ्रान्स व पाश्चिमात्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे.
फ्रान्सप्रमाणेच इतरत्रही हल्ले करण्यासाठी दहशतवादी तयारीत असल्याची भीती
पॅरिस : फ्रान्समधील हल्ल्यानंतर आता युरोपात इतरत्रही दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे, असे फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल व्हाल्स यांनी सांगितले.
युरोपात हल्ल्यांची तयारी दहशतवादी करीत आहेत. केवळ फ्रान्सच त्यांचे लक्ष्य नाही, असे सांगून ते म्हणाले, की बराच काळपासून फ्रान्स दहशतवादी हल्ल्यांच्या सावटाखाली आहे. शुक्रवारच्या हल्ल्यात तरुण लोकांना संगीत केंद्रात लक्ष्य करण्यात आले, तेथे आजूबाजूचे बार व रेस्टॉरंटमध्ये हल्ले करण्यात आले. स्टेडियममध्येही हल्ला करण्यात आला या हल्ल्यात १२९ जण ठार झाले.
‘शार्ली हेब्दो’नंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डाव साधला आहे, फ्रान्ममधील अनेक तरुण लोकांना त्यांनी ठार केले आहे. जानेवारीपासून आमचा देश दहशतीच्या सावटाखाली आहे, असे त्यांनी सांगितले.