येथील लष्करी मुख्यालयाच्या सेनाभवन इमारतीचा काही भाग शुक्रवारी एक सैनिक करोनाबाधित आढळल्याने बंद करण्यात आला आहे. आता या संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
करोना रुग्ण सापडल्यानंतरची सर्व प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून फवारणी करण्यात आली आहे. सेनाभवन इमारतीतील क्वार्टरमास्टर महासंचालनालयाचा भाग बंद करण्यात आला असून १३ मे रोजी लष्कराचा एक जवान करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या जवानाने त्याच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात आत्महत्या केली. त्या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोगही होता. त्यातच करोना झाल्याने त्याने नैराश्यातून आत्महत्या केली.
गुरुवारी लष्क रप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी असे सांगितले होते की, लष्कर कोविड-१९ बरोबर लढण्यास सज्ज आहे. सध्याच्या परिस्थितीत लष्करातील सर्वाचेच मनोधैर्य उंचावलेले आहे. आम्हाला जी सेवा करण्यास सांगितली जाईल ती आम्ही पार पाडू. सीमांचे रक्षण करण्यापासून नागरी अधिकाऱ्यांना कोविड-१९ सारख्या पेचप्रसंगी मदत करण्यात आम्ही केव्हाही सज्जच आहोत.
