लिझ मॅथ्यू/ एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

इंदूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणारा आपला पुत्र आकाश विजयवर्गीय याच्या वर्तणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना: ‘पक्ष सवरेपरी आहे’ आणि मोदी हे आमचे ‘सर्वोच्च नेते’ आहेत, त्यामुळे भाजपने आपल्या मुलाविरुद्ध कारवाई करावी, असे पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपच्या राज्य शाखेने आकाश यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्या वर्तणुकीबाबत स्पष्टीकरण मागवले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

पक्षाचा निर्णय काहीही असेल आणि कितीही कठोर असेल, तरीही तो स्वीकारण्यास आपण तयार आहोत, असे विजयवर्गीय यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. मी हा वाद संपवू इच्छितो. आम्ही सर्व पक्षाचे सेवक आहोत. भाजपचे नेतृत्व या प्रकरणी जो काही निर्णय घेणार असेल तो आम्ही मान्य करू इच्छितो. भाजप आमच्यासाठी सर्व काही असून आम्ही पक्षाचे आणखी नुकसान करू इच्छित नाही, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या तीव्र नाराजीनंतर आकाश याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल अशी चर्चा पक्षात सुरू होती.

पंतप्रधानांचा शब्द अंतिम : पंतप्रधानांचा शब्द अंतिम असेल, असे लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्तिमित करणाऱ्या विजयाचे श्रेय देण्यात आलेले विजयवर्गीय म्हणाले. पंतप्रधान आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि त्यांचे निर्देश पाळणे हे पक्षाचे कर्तव्य आहे. पंतप्रधान पक्षाच्या भल्याचाच निर्णय घेतील याची आपल्याला खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले.