भारत बायोटेकने देशात विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीचा नैदानिक चाचण्यांचा टप्पा पार पडला असून, आता सीरम इन्स्ट्यिूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड लशीप्रमाणेच तिलाही नियमित व मर्यादित प्रमाणात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले.

कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या दोहोंचा परवानाविषयक दर्जा सारखाच आहे, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘कोव्हॅक्सिन ही नैदानिक चाचण्यांच्या पद्धतीने दिली जाण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही,’ असे ते म्हणाले.

‘सुमारे १८ लाख लोकांना कोव्हॅक्सिन लस यापूर्वीच देण्यात आली आहे. ती सुरक्षित असल्याचेही सिद्ध झाले आहे. केवळ ३११ व्यक्तींमध्ये त्याचे नाममात्र दुष्परिणाम दिसून आले आहेत. भारताच्या संशोधन आणि विकास उद्यमासाठी, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान उपक्रमासाठी हा मोठा विजय आहे,’ असे डॉ. पाल यांनी नमूद केले.

भारताच्या औषध नियंत्रकांनी ३ जानेवारीला सार्वजनिक हिताकरिता कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापराला नैदानिक चाचणी पद्धतीनुसार परवानगी दिली होती.