रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रखर टीकेचा सामना करत असलेल्या भारतीय रेल्वेने आता परिस्थिती बदलण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेच्या देशभरातील सर्वच विभागांमध्ये दर रविवारी सहा ते सात तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीची सर्व कामे केली जातील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. तसंच देखभाल दुरूस्तीच्या कामांमुळे रविवारी गाड्यांना उशीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जर गाडीला उशीर झाला तर रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी मोफत भोजनाची व्यवस्था केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. पण ही सुविधा केवळ आरक्षित डब्यांतील प्रवाशांसाठीच असून अनारक्षित डब्यांतील प्रवाशांना भोजन सुविधा देण्याविषयी विचार केला जाईल. मात्र, त्यांच्या नेमक्या संख्येचा अंदाज लावणे त्रासदायक ठरेल,’ असे गोयल म्हणाले.

येत्या १५ ऑगस्टपासून रेल्वेचं वेळापत्रक बदलण्यात येईल. त्यानंतर दर रविवारी रेल्वेच्या देशभरातील सर्वच विभागांमध्ये मेगाब्लॉक सुरू केला जाईल. साधारण वर्षभर रेल्वेकडून हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी यापुढे रविवारचा दिवस त्रासदायक ठरणार आहे. मात्र, रविवारच्या मेगाब्लॉकची प्रवाशांना एसएमएस; तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरातींद्वारे पूर्वसूचना दिली जाईल. प्रवाशांनी आपल्या मोबाइल फोनवर गाडीचा क्रमांक टाइप केल्यास त्यांना गाडी कुठवर पोहोचली याची माहिती मिळेल. प्रत्येक गाडीच्या वाटचालीची नोंद करण्यासाठी रेल्वेच्या प्रणालीमध्ये जीपीएस लॉगर्सचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे.