News Flash

उत्तर प्रदेशात पतंजलीचा फूड पार्क प्रकल्प रुळावर?

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर माघारीच्या निर्णयाचा कंपनीकडून फेरविचार

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर माघारीच्या निर्णयाचा कंपनीकडून फेरविचार

बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या प्रस्तावित फूड पार्क प्रकल्पाच्या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सरकारी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे या प्रकल्पातून माघार घेण्याच्या आधीच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे पतंजलीने स्पष्ट केले.

यमुना द्रुतगती मार्गालगत ४२५ एकर जमिनीवर ६,००० कोटींचा फूड पार्क प्रकल्प उभारण्याची घोषणा पतंजलीने केली होती. मात्र, हा प्रकल्प सरकारी लालफितीत अडकल्याने कंपनीने नाराजी व्यक्त केली होती. प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरण करण्यास होणारा विलंब आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे प्रकल्पातून माघार घेत असल्याचे कंपनीने मंगळवारी म्हटले होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सूत्रे वेगाने फिरली. ‘‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. या प्रकल्पासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आले असून, प्रकल्प सुरू होणार आहे. प्रकल्पासाठीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे’’, असे माहिती विभागाचे प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले.

हा प्रकल्प अद्याप रद्द झालेला नसल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया विभागाचे सचिव जे. पी. मीना यांनी म्हटले होते. ‘‘प्रकल्पासंबंधीच्या प्रक्रियेसाठी पतंजलीला एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनीने अटीचे पालन करायला हवे. तसे न केल्यास प्रकल्प रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही’’, असे मीना यांनी नमूद केले होते.

पतंजलीच्या या प्रकल्पात वार्षिक २५,००० कोटींच्या अन्नपदार्थाचे उत्पादन होणार असून, सुमारे १० हजार थेट रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 1:14 am

Web Title: patanjali food park project
Next Stories
1 निपा विषाणूबाधित मृतांचे अंत्यसंस्कार करण्यातही डॉक्टरांची मदत
2 चौकशीस उपस्थित राहण्यासाठी चिदंबरम यांना समन्स
3 तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देताय; प्रणव मुखर्जींना मुलीनेच सुनावलं
Just Now!
X