मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध उद्योगपती आणि पाथ इंडिया कंपनीचे संचालक पुनीत अग्रवाल यांच्या कुटुंबावर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच काळाने झडप घातली. अग्रवाल यांच्या पातालपानी येथील फार्म हाऊसवर नवीन वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये घडलेल्या अपघातात अग्रवाल यांच्यासहीत त्यांची मुलगी, जावई, नातू आणि दोन नातेवाईकांचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पुनीत हे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पत्नी, मुलगी, जावई, नातू आणि काही नातेवाईकांबरोबर पानिपत येथील फार्महाऊसवर गेले होते. या फार्महाऊसमध्ये उभारण्यात आलेल्या एका टेहाळणी टॉवरमधील कॅप्सूल लिफ्टमधून खाली येत असतानाच अपघात झाला. अचानक या लिफ्टचा दोर तुटल्याने ती ७० फुटांवरुन खाली कोसळली. यामुळे लिफ्टमधील अनेकजण बाहेर फेकले गेले. यातच ५३ वर्षीय पुनीत, त्यांची २७ वर्षीय मुलगी पलक, २८ वर्षीय जावई पलकेश अग्रवाल, तीन वर्षाचा नातू नव यांच्याबरोबरच मुंबईतील पलकेश यांचे मेहुणे गौरव आणि ११ वर्षीय मुलगा आर्यवीर या सहा जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये गौरव यांची पत्नी निधी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला महू पोलिसांनी दुजोरा दिला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अग्रवाल कुटुंबिय मंगळवारी सकाळी फार्महाऊसवर आले होते. संध्याकाळी फार्महाऊसच्या आजूबाजूच्या परिसरातील सौंदर्य पाहण्यासाठी हे सर्वजण टॉवरवर गेले होते. मात्र उतरताना ७० फूटांवरुन लिफ्ट खाली पडली. या अपघातामध्ये लिफ्टमधील सर्वजण बाहेर फेकले गेले. या दूर्घटनेची माहिती फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना चोईथराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र या अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी केवळ निधी यांचे प्राण वाचले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुनीत यांचा मुलगा निपूण लिफ्टमध्ये जागा नसल्याने टॉवरच्या वरील भागावरच थांबल्याने तो थोडक्यात बचावला. तर निपूणची पत्नी गरोदर असल्याने ती घरीच असल्याने तिही बचावली.

महू येथे पुनीत हे मोठे प्रस्थ होते. त्यांचा स्थानिकामधील जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी महूमध्ये वाऱ्यासारखी पसरली. आज पुनीत यांच्या स्मरणात महू बंदची हाक स्थानिकांनी दिली होती. अनेकांनी आज आपली दुकाने बंद ठेवली होती.

पुनित अग्रवाल आहेत तरी कोण?

पुनीत अग्रवाल हे मध्य प्रदेशमधील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. पाथ इंडिया कंपनीबरोबरच ते एकूण १४ कंपन्यांचे संचालक होते. देशभरातील आठ राज्यांमध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट पुनीत यांच्या कंपनीकडे आहे. देशभरामध्ये पीपीपी तत्वावर बनवण्यात येणारे रस्ते बांधण्यात, त्यांचे नियोजन करण्यात पुनित यांनी पाथ इंडिया ही अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने आत्तापर्यंत तीन हजार हायवेंचे बांधकाम केले आहे. पुनित यांची एकूण संपत्ती एक हजार ९९२ कोटी इतकी आहे.