जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द केल्याच्या वर्षपूर्तीनंतर केंद्र सरकारने जमीन खरेदी आणि मालकी हक्क कायद्यात बदल केला आहे. त्यानुसार, आता जम्मू आणि काश्मीरमध्ये उर्वरित भारतातील नागरिकांना जमीन खरेदी करण्याची मुभा मिळाली आहे. यावरुन भडकलेल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्याने एक धक्कादायक विधान केलं आहे. जर उर्वरित भारतातील लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक झाले तर इथे बलात्कार वाढतील असं या नेत्यानं म्हटलं आहे.

सुरिंदर चौधरी असं वादग्रस्त विधान करणाऱ्या या पीडीपी नेत्याचं नाव आहे. चौधरी हे पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांचे निकटवर्तीय आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना चौधरी म्हणाले, “जम्मूला डोग्रा संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. आम्ही देशासाठी अनेक बलिदानं दिली आहेत. आम्ही असं म्हणत नाही आहोत की ते इकडे येऊन स्थायिक झाल्यानंतर बालात्कारासारखे गुन्हे करतील. पण जे आसाम आणि महाराष्ट्रानं म्हटलं तेच आम्ही म्हणत आहोत की, बाहेरच्या लोकांनी इथं येऊ नये अन्यथा ते इथला रोजगार हिसकावून घेतील.”

“सध्या जम्मूचा भाग हा शांततापूर्ण आहे. विविध भागातील गावांमधून मुली इथे शिक्षणासाठी येतात. तुम्ही पाहिलच असेल की फरीदाबादमध्ये काय झालं, जिथे एका मुलीला गोळी घालून मारण्यात आलं तसंच हाथरसमध्ये काय झालं? बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, हे सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवर दाखवलं जातंय.”

दरम्यान, केंद्रानं मंगळवारी अनेक कायद्यांमध्ये सुधारणा केल्या. यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी आणि मालकी हक्कासंदर्भातील कायद्याचाही समावेश होता. केंद्राच्या या निर्णयावर जम्मू आणि काश्मीर तसेच लडखमधील मुख्य स्तरातील राजकीय पक्षांकडून मोठी टीका झाली. एक पुरातन राज्य आता विकायला काढलं असल्याचं मत या पक्षांनी व्यक्त केलं होतं.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये उर्वरित भारतातील लोकांना स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नव्हता. मात्र, आता ही कलमंच रद्द झाल्याने तसेच जमीन खरेदी कायद्यातही केंद्राने बदल केल्याने या भागात जम्मू-काश्मीरबाहेरील लोकांना जमिनी विकत घेता येणार आहेत. आपल्या निर्णयाचं समर्थन करताना भाजापानं म्हटलं की, यामुळे आता काश्मीरमध्ये विकासाची धारा वाहायला लागेल. तसेच हा नवा केंद्रशासित प्रदेश विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करेल.